प्रश्नोत्तरे

प्रश्नोत्तरे

1) उचकी लागते ती कशामुळे? उचकी हा रोग आहे का? मला उचकी लागली व घरगुती उपाय केले की काही प्रमाणात बरे वाटते, परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा उचकी लागते. यावर औषधे, पथ्ये कोणती, याबद्दल सुयोग्य मार्गदर्शन करावे.
..... मधुसूदन देशपांडे

उत्तर - आयुर्वेदीय परिभाषेत प्राणवायू उदानयुक्‍त झाल्याने त्याची स्वाभाविक गती बदलून वरच्या बाजूला हिकप्‌, हिकप्‌ असा आवाज करत वरच्या बाजूला उचलला जातो, तेव्हा उचकी लागते. जी उचकी कधीतरी लागते आणि घोटभर पाणी प्यायल्याने शांत होते किंवा श्वासाचा रोध करून आवंढा गिळल्याने थांबते ती रोगस्वरूप नसते. मात्र वारंवार उचकी लागणे, साध्या उपायांनी न थांबणे हा रोग समजला जातो. आयुर्वेदात उचकी या रोगाचे पाच प्रकार समजावलेले आहेत. यामध्ये वात वाढविणारे अन्नपदार्थ किंवा आचरण अपथ्यकर असते. मलमूत्रादी नैसर्गिक वेग बळेच धरून ठेवणे हेसुद्धा उचकी लागण्यामागचे कारण असू शकते. वारंवार उचकी लागत असली तर सैंधवयुक्‍त पाण्याचे चार-पाच थेंब नाकात टाकून नस्य करण्याचा उपयोग होतो असा अनुभव आहे. तसेच अहळीव पाण्यात भिजत घालून ते उलले की गाळून घेतलेले पाणी घोट घोट पिण्यानेही उचकी थांबते. मोराची पिसे किंवा अख्खी वेलची कढईत जाळून तयार झालेली राख व मध यांचे मिश्रण चाटण्यानेही उचकी थांबते. या उपायांनी बरे वाटेल, पण पुन्हा पुन्हा उचकी लागणे हे वाताच्या बिघाडाचे निदर्शक लक्षण असल्याने एकदा वैद्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन घेणे चांगले होय.

2) माझी त्वचा अतिशय कोरडी पडते, संपूर्ण अंग खरखरीत वाटते. या कोरडेपणामुळे फार अस्वस्थ वाटते. रात्री लगेच झोपही येत नाही. सध्या मी त्वचेला क्रीम आणि बदामाचे तेल लावते आहे. तसेच महामंजिष्ठादी काढा घेते आहे. कृपया उपाय सुचवावा.
... आशा करेंबळीकर

उत्तर - कोरडेपणा त्वचेवर जाणवत असला तरी त्याचे मूळ शरीराच्या आत आहे. तेव्हा फक्‍त बाहेरून त्वचेला स्निग्धता देणे पुरेसे ठरणार नाही, तर पुरेसे स्निग्ध पदार्थ पोटातही जायला हवेत. यासाठी सकाळ-संध्याकाळ एक-एक चमचा पंचतिक्‍त घृत घेण्याचा उपयोग होईल. आहारात रोज चार-पाच चमचे घरी बनविलेले साजूक तूप घेण्याचाही उपयोग होईल. शरीरात वाढलेला वात आणि उष्णता कमी करण्यासाठी "संतुलन वातबल', तसेच "संतुलन पित्तशांती' गोळ्या घेण्याचाही उपयोग होईल. नियमित पादाभ्यंग करणे आणि अंगाला संतुलन अभ्यंग तेलाचा खालून वर या दिशेने अभ्यंग करणे हे सुद्धा चांगले. वांगे, ढोबळी मिरची, गवार, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, चिंच, दही या गोष्टी आहारातून वर्ज्य करणेही श्रेयस्कर.

3) मी "फॅमिली डॉक्‍टर'चा नियमित वाचक असून मला त्याचा नेहमीच फायदा झालेला आहे. माझी प्रकृती चांगली आहे, मात्र अलीकडे शौचाला पातळ व चिकट होते. सकाळी एकदाच जावे लागते, पण शौचाला बांधून होण्यासाठी काही उपाय सुचवावे.
.... तासगावकर

उत्तर - शौचाला पातळ व चिकट होणे हे अग्नीची कार्यक्षमता मंदावल्याचे आणि आतड्यांची ग्रहणशक्‍ती कमी झाल्याचे निदर्शक असते. यासाठी आहार पचण्यास साधा-सोपा घेणे ही पहिली महत्त्वाची पायरी होय. यासाठी साधे घरचे खाणे, तेलाचा कमीत कमी किंवा शून्य वापर, मांसाहार वर्ज्य करणे, काही दिवस गव्हाऐवजी ज्वारी व तांदळावर भर देणे वगैरेंचा उपयोग होईल. जेवणानंतर चमचाभर "बिल्वसॅन' तसेच कूटजारिष्ट घेता येईल. सकाळ-संध्याकाळ कामदुधा तसेच प्रवाळपंचामृत या गोळ्या घेण्याने, जेवणानंतर ताकाबरोबर पाव चमचा लवणभास्कर चूर्ण घेण्यानेही बरे वाटेल.

4) "फॅमिली डॉक्‍टर' ही पुस्तिका अतिशय संग्राह्य आहे. सामाजिक आरोग्याच्या निकडीच्या गरजा भागवणारी आहे. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अनेक गैरसमज व अज्ञान दूर करणारी आहे. माझा प्रश्न असा आहे की दूर्वा किती प्रकारच्या असतात? दूर्वांचा आरोग्यासाठी काय उपयोग असतो? दूर्वाचा रस कसा घ्यायचा असतो? कृपया मार्गदर्शन करावे.
.... अतुल

उत्तर - आयुर्वेदात दूर्वांचे दोन प्रकार समजावलेले असले तरी, दोन्ही प्रकारांचे गुणधर्म एकच असतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूर्वा उष्णता कमी करणाऱ्या, रक्‍त शुद्ध करणाऱ्या, स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयातील उष्णता कमी करणाऱ्या असतात. दूर्वांचा रस दिवसातून एकदा किंवा दोन वेळा घेता येतो व त्याचे प्रमाण अर्धा तोळा म्हणजे पाच-सहा ग्रॅम किंवा साधारण एक चमचा इतके असते. दूर्वांचे काही महत्त्वाचे उपयोग असे - लघवी करताना आग होत असली, उष्णता वाढल्याने हातापायांची आग होत असली, तहान शमत नसली तर अशा प्रकारे दूर्वांचा रस घेता येतो. नाकातून रक्‍त येत असल्यास दूर्वांच्या रसाचे नस्य करता येते. घामोळ्यांवर दूर्वांच्या रसात तांदूळ कुटून तयार केलेला लेप लावण्याचाही उपयोग होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com