Last Update:
 
क्‍लासमेट

न्यूटनच्या सफरचंदाच्या झाडाची अवकाश सफर!
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 05:45 PM (IST)
Tags: classsmate
गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागला, त्याची कथा तुम्हा-आम्हा सर्वांनाच माहीत आहे. झाडावरून सफरचंद पडताना पाहिले आणि महान संशोधक न्यूटन यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्‍तीचा सिद्धांत मांडण्याची प्रेरणा मिळाली. मात्र इतक्‍या वर्षांनंतर आता न्यूटन यांच्या याच सफरचंदाच्या झाडाने, हाच गुरुत्वाकर्षणाचा नियम मोडला आहे. नुसता मोडलाच नाही, तर चक्‍क ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर जाऊन अवकाश सफर करून आले आहे.
सर आयझॅक न्यूटन यांनी झाडावरून पडणाऱ्या सफरचंदापासून प्रेरणा घेऊन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्‍तीची संकल्पना मांडली. यामुळे पुढील अनेक क्रांतिकारी संशोधनांना मोठा फायदा झाला. न्यूटन यांना प्रेरणादायी ठरलेले ते ऐतिहासिक झाड, म्हणजे त्याचे अवशेष अजूनही जपून ठेवण्यात आले आहे. या झाडाच्या एका तुकड्याला नुकत्याच अवकाशभरारी घेऊन परतलेल्या नासाच्या ऍटलांटिस या यानातून अवकाश भरारी घडवून आणण्यात आली. सर न्यूटन यांना आणि त्यांच्या संशोधनाचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.
हा तुकडा ब्रिटनमधील रॉयल सोसायटीच्या संग्रहालयात ठेवण्यात आला होता. मात्र हा तुकडा ब्रिटनमध्ये जन्मलेला अवकाशवीर डॉ. पियर्स सेलर्स यांना देण्यात आला. दहा सेंटीमीटर आकाराचा हा तुकडा व सर न्यूटन यांचा फोटो यांना डॉ. सेलर्स यांनी आपल्यासोबत अवकाशात नेले होते. १४ मे रोजी ऍटलांटिस यानाने अवकाशात झेप घेतली होती. हे यान अवकाश स्थानकाशी जोडले गेले व त्याबरोबर पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहिले. यानंतर बारा दिवसांनी ते पृथ्वीवर परतले आहे. ब्रिटनची वैज्ञानिक संस्था रॉयल सोसायटीच्या ३५० व्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांच्या सन्मान करण्याच्या उद्देशाने न्यूटन यांच्या त्या प्रेरणादायी झाडाचे अवशेष अवकाशात नेण्यात आले होते. अशा पद्धतीने वैज्ञानिक इतिहासाचा असा एक असाधारण हिस्सा असलेली वस्तू अवकाशात नेण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2010 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: