Last Update:
 
सदरे

आणि कांबळींच्या रायगडाला जाग आली!
विजय कापडी
Monday, November 21, 2011 AT 01:45 AM (IST)
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याने पंधरा वर्षांपूर्वीच्या सामन्यात "फिक्‍सिंग' झाल्याची शक्‍यता बोलून दाखवल्याबरोबर संपूर्ण क्रिकेट विश्वातच जी खळबळ उडाली आहे त्याविषयी "दूध का दूध-और पानी का पानी' करण्याच्या हेतूने मी विनोदशी गाठभेट घेतली आणि विचारलं, "विनोद, तुझ्या नावातच विनोद आहे म्हणून विचारतोय.. पंधरा वर्षांपूर्वीच्या फिक्‍सिंगविषयी तू जे बोललास ते विनोदानं घ्यायचं का गांभीर्यानं?'

नाक फुगवून आणि चेहऱ्यावर पुरेपूर गांभीर्य फासून धीरगंभीर आवाजात विनोद म्हणाला, "कर्म माझं.. असे मी विनोद करतो तेव्हा तुमच्यापैकी कुणीच हसत नाही.. आणि आता गंभीरपणे काही सांगू पाहतोय तर तुम्हाला शंका येऊ लागलीय, की हा विनोदचा विनोद.. अरे, हा फिक्‍सिंगचा मामला आहे.. हसण्यावारी नेण्यासारखं त्यात काहीच नाहीये..'

"पण अचानक शहाण्णव सालातली म्हणजेच तब्बल पंधरा वर्षांपूर्वीच्याच घटनेची तुला का आठवण व्हावी... थोडक्‍यात म्हणजे तुझ्या रायगडाला पंधरा वर्षांनंतर का जाग यावी?'

यावर गाढ निद्रेतून खडबडून जागा होणाऱ्या माणसाप्रमाणे चेहरा करीत विनोद म्हणाला,"कुठे बोलू नकोस पण क्रिकेट क्षेत्रात आता मला फारसा भविष्यकाळ उरलेलाच नाही. खरं म्हणजे मिट्ट काळोखच काळोख आहे. त्यामुळे आजकाल मी भूतकाळातच वावरत असतो. भूतकाळातल्या आठवणी रम्य असतात. त्या काळात मी शतके द्वितशके झळकावायचो.. माझी करिअर मस्तपैकी झेप घेत होती .. तो काळ आठवायला मला आवडतं-पण गंमत अशी झाली, की अचानक मला त्या सामन्याची आठवण झाली ! खरं म्हणजे त्या सामन्याबद्दल आमच्यातले सर्वजण विसरून गेलेत.. आमच्यात अशी एक पद्धतच आहे, की शून्यावर बाद झालेले सामने विसरून जायचे आणि शतक निघालेले सामनेच पुनः पुन्हा आठवत बसायचे.. पण अकस्मात मला तो सामना आठवला. खरे म्हणजे मी तो सामना जिंकून देऊ शकलो असतो... पण सामनाच रद्द झाला.. त्यावेळी मला रडू कोसळलेले तुला आठवते?'

"हो ना.. सेक्‍युरिटी गार्डस्‌च्या घोळक्‍यात तू रडत रडत तंबूच्या दिशेने निघाला होतास..' मीही काहीसा सद्‌गदित होत दुजोरा दिला. "त्यापेक्षा महत्त्वाचे ते असे होते, की एखाद्या राजवाड्याच्या भक्कम बुरुजाप्रमाणे असलेले संघातले अतिरथी महारथी फलंदाज एकामागून एक कोसळत होते... आणि ते अप्रिय दृश्‍य डोळ्यासमोर आणत असतानाच माझ्या डोक्‍यात ट्यूब पेटली! अरे बापरे.. ही मंडळी फिक्‍स तर झाली नसतील ना? बस्स, ते मी कालपरवा बोलून दाखवले..'

"म्हणजे त्यावेळी तुला तसा संशय आला नव्हता का?'
"नाही आणि होय!'
"म्हणजे काय? एका प्रश्‍नाचं होय आणि नाही असं उत्तर कसं असू शकेल?'
सावधचित सुरात विनोद म्हणाला, " ते इतर वेळी. हा फिक्‍सिंगचा मामला आहे. त्यामुळे उत्तर काहीही असू शकतं.'
विनोदाच्या अनाकलनीय समर्थनामुळे मी म्हणालो, "अरे, पण खंद्या फलंदाजांनी नांगी टाकण्याचे प्रसंग आपल्याकडं आजही होताना दिसतात. पूर्वीही कितीतरी वेळा झालेत..'

"झालेत ना.. मी कुठं नाही म्हणतोय? पण या सामन्याच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही.. मला संशय येतोय. खरं म्हणजे मी अद्याप बोललेलो नाही. पण स्टेडियमवरचे प्रेक्षक सुद्धा फिक्‍स झाले असावेत असेही मला वाटले होते..'
"काय? स्टेडियमवरचे प्रेक्षक सुद्धा?' मी आश्‍चर्याने ओरडलोच.

"अरे, कोलकत्याचे प्रेक्षक तसे खिलाडू वृत्तीचे. फूटबॉल तर त्यांच्या नसानसातला. आम्ही हरत चाललो आहोत म्हणून त्यांनी जाळपोळ का करावी? बाटल्या का फेकाव्यात? हुल्लड का माजवावी? अरे, तेच नाही तर सामन्याचे निरीक्षक क्‍लाईव्ह लॉईड महाशय देखील फिक्‍स असावेत.. आतापर्यंत अर्ध्यावरच सामना संपवून, दुसऱ्या संघाला विजयी घोषित केलं गेलंय का कधी? तूच सांग..'

विनोदचे हे सगळे सहन करण्यापलिकडचेच होते. त्यामुळे, "त्या फिक्‍सिंगपासून तू कसा दूर राहिलास' हा प्रश्‍न न विचारताच मी हळूच सटकलो.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: