पणजी, ता. 27 ः देशाची एकता, अंहिसा, संस्कृतीचा गजर आणि स्वातंत्र्यसैनिकांचे गुणगान करणारे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे भाषण, त्याला मिळालेली गोमंतकीय व भारतीय संस्कृतीवर नृत्यनाट्यांची जोड हे गोव्यातील 63 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे आजचे वैशिष्ट्य होते. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेच्या बडग्यातला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम तासाभरात आटोपला.
देशात राष्ट्रपती व राज्यात राज्यपाल भारताच्या गणतंत्रदिनी 26 जानेवारी रोजी दरवर्षी ध्वाजारोहण करतात परंतु
यंदा महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त ताबा आहे. श्री. शंकरनारायणन यांना महाराष्ट्रातही ध्वजारोहण करायचे होते व त्यामुळे गोव्यातील झेंडावंदनाची जबाबदारी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. कामत यांच्यावर टाकली. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे तसेच मुख्यमंत्री श्री. कामत हे कॉंग्रेसचे एक इच्छुक उमेदवार असल्यामुळे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यास सरकारने निवडणूक आयोगाकडे परवानगी घेतली. मुख्य निवडणूक आयोगाने परवानगी देताना आचारसंहिता व काही अटींचे पालन करण्याचे आदेश दिले. त्यालाही येथील एका स्थानिक वकिलांनी आव्हान दिले होते, हजारोंच्या उपस्थितीत मुख्यमंत्री ध्वजारोहण करतील व त्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळेल, मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही नामी संधी आहे असा दावा सदर वकिलांनी केला होता. मात्र निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांहस्ते झेंडावंदनास तसेच संध्याकाळी राजभवनावर त्यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या चहापानासही हिरवा कंदील दाखवला आहे. कोणतीही राजकीय भाषणबाजी नको, विकासाचे दावे नकोत फक्त स्वातंत्र्यसैनिकांचे गोडवे गा अशी अट निवडणूक आयोगाने घातल्यामुळे त्याचे तंतोतंत पालन करून प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम राजधानीतील कांपाल मैदानावर झाला.
सूर्य कधी अस्ताला जाणार नाही असा टेंभा मिरवणाऱ्यांना भारतीयांनी अहिंसात्मक मार्गाने भुईसपाट केले, देशात प्रजेचे प्रजेने प्रजेसाठी चालवलेले राज्य मार्गस्थ झाले असा दावा श्री. कामत यांनी आपल्या भाषणात केला. भारतात भिन्न धर्म, जाती, पंथाचे नागरिक असल्यामुळे देशात लोकशाही नांदणार नाही, देशाचे तुकडे होतील अशी भावना परकीयांनी निर्माण केली होती परंतु अखंडता, एकतेच्या बळावर वैविध्येतून एकात्मतेचे जतन करीत भारत पुढे मार्गक्रमण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेतील तरतुदीमुळे विघटित होणारा भारत अखंड राहिला आहे त्याचे मुख्य कारण भारतीय संस्कृतीत लपले असल्याचे ते म्हणाले. सगळे धर्म, जातींना बांधून ठेवणारी भारतीय संस्कृती ही आपली मोठी ताकद असून त्या बळावर आपण आक्रमणेही परतवून लावली आहेत, निवडणुका अहिंसात्मक मार्गाने होऊन लोक आपल्याला पाहिजे त्यांनाच निवडून देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सगळ्या क्षेत्रात कीर्ती प्राप्त करणाऱ्या भारताकडे आज जग विश्वासाने पाहात असून एकजूट बांधून सगळ्यांनी काम केल्यास भारत सुपरपॉवर होईल, गोमंतकीयांनीही त्यासाठी हातभार लावावा असे आवाहन त्यांनी केले.
पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम टाळून प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम झाला. तीनशे, चारशेच्या विद्यार्थी समूहांनी केलेली नृत्ये, सादर केलेली गीते देशभक्तीचे वातावरण तयार करून गेली.
सभापती प्रतापसिंह राणे, विजयादेवी राणे, उपसभापती मावीन गुदिन्हो, खासदार शांताराम नाईक व बिना नाईक, खासदार श्रीपाद नाईक, पणजीचे महापौर यतीन पारेख, वाहतूकमंत्री रामकृष्ण ढवळीकर, सरकारी अधिकारी, विद्यार्थीवर्गाची कार्यक्रमाला उपस्थिती होती.