प्रशिक्षणच दिले नसल्याने उपकरणे कशी हाताळणार? - गोमेकॉतील कर्मचाऱ्यांपुढे प्रश्न
पणजी, ता. 27 ः गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय उपकरणे हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण वेळोवेळी दिले जात नसल्याने अपघात घडत असल्याची माहिती पुढे आली आहे. इस्पितळात नवीन उपकरणे आणल्यानंतर ती कशी हाताळावीत, याची माहिती परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना दिली जात नाही. काही वरिष्ठ डॉक्टरांनाच त्याची माहिती असते. पण त्यांच्या गैरहजेरीत हाताखालच्या कर्मचाऱ्यांना ती हाताळता येत नाहीत. बालचिकित्सा विभागातील वॉर्मर यंत्रणेच्या बाबतीत धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे.
नवजात बालकाचे वजन कमी असल्यास किंवा वेळेपूर्वी बाळ जन्मल्यास त्याला ऊब देण्यासाठी वॉर्मरमध्ये ठेवले जाते. पण ही यंत्रणा सुरक्षितपणे हाताळता येत नसल्याने वर्षभरात तीन बालके दगावली आहेत. त्यातच वॉर्मरला आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही वॉर्मरच्या सुरक्षेकडे गंभीरपणे लक्ष देण्यात आलेले नाही. काही नवीन उपकरणे कोणालाही हाताळता येत नसल्याने पडून आहेत. त्यामुळे ती गंजून गेली आहेत. काही यंत्रोपकरणे मोडकळीस आली असतानाही त्यांचा वापर केला जात आहे. इतर उपकरणांच्या बाबतीत हीच स्थिती आहे. यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात येत आहे.
यासंदर्भात गोमेकॉचे डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल यांच्याशी संपर्क साधला असता, वॉर्मर हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी ही यंत्रणा हाताळतात आणि ती सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला आहे. वेळोवेळी इस्पितळाच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात असल्याचेही ते म्हणाले.
अग्निशमन दलाकडून प्रशिक्षण देणार
गोमेकॉ हे राज्यातील सर्वांत मोठे सरकारी इस्पितळ असून, येथे रोज सुमारे 1600 रुग्ण उपचारासाठी येतात. त्यासाठी इस्पितळातील प्रत्येक वॉर्डमध्ये अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात आली आहे. पण, ही यंत्रणा कर्मचाऱ्यांना हाताळता येत नाही. परिचारिका, अटेंडंट व इतर कर्मचाऱ्यांना वेळप्रसंगी आग प्रतिबंधक यंत्रणा हाताळता यावी, यासाठी अग्निशमन दलाकडून प्रशिक्षण देण्याचा गोमेकॉ प्रशासन विचार करत आहे. तसा प्रस्ताव मांडला जाणार आहे, असे सांगण्यात येत आहे.