Last Update:
 
मुख्य पान

आमदाराचे प्रगतिपुस्तक प्रियोळ मतदारसंघ ः दीपक ढवळीकर
प्रतिनिधी
Saturday, January 28, 2012 AT 01:30 AM (IST)
माशेल, ता. 27 ः प्रियोळ मतदारसंघ हा भौगोलिकदृष्ट्या डोंगर-दऱ्यांचा, कुळागारांनी व्यापलेला आणि विकासाच्या दृष्टीने मागासलेला असा मतदारसंघ आहे. सुरुवातीची 17 वर्षे आणि भाजपची राजवट सोडल्यास हा मतदारसंघ विरोधी पक्षाकडेच राहिला. त्यामुळे या मतदारसंघाचा तसा विकास झालेला. 2007 साली विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाचे दीपक ढवळीकर आमदार म्हणून मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडून आले आणि त्यांनी सरकारलाही पाठिंबा दिल्याने त्यांनी सरकारसमोर ठेवलेल्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य मिळाले. 

या मतदारसंघातील बाणस्तारी, माशेल ते अमोणे पुलापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण झाले. माशेल-खांडोळा, सावईवेरे, केरी फोंडा रस्त्याची सुधारणा झाली. माशेल-कुंभारजुवे पूल व माशेल-टोंक रस्त्यांचे रुंदीकरण व हॉटमिक्‍स डांबरीकरण झाले. डोंगराळ भागातील शीलवाडा, जांबूळ, बोडायो, कणकवाडा येथे नवीन रस्ते झाले. खेडे, आमचेवाडा, आताडी, पाळी, बोडथे येथे पिण्याच्या पाण्याची सोय झाली. केरी, पाल, या खेडेगावातून बसची सोय केली. 

या मतदारसंघात 12 तळी बांधून कुळागरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. शिमगोत्सव, धालो, मांडाचे नूतनीकरण व सुशोभीकरण झाले. गणेश विसर्जन स्थळे प्रत्येक गावात बांधली आहेत. माशेल, भोम येथील प्रमुख नाल्याच्या बांधकामाबरोबर प्रत्येक गटार बांधकामे केली आहेत. फार्मर्स क्‍लब तयार करून त्यांना कृषी खात्याच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला. महिलांचे सुमारे 150 स्वयंसाहाय्य गट तयार करून त्यांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियोळ मतदारसंघ हा सांस्कृतिक वारसा लाभलेला मतदारसंघ असल्याने येथील सांस्कृतिक संस्थांना सरकारी मदत मिळवून देण्यात आली. 

भजन व फुगडी स्पर्धांना उत्तेजन देण्यासाठी महिलांना आवश्‍यक साहित्याबरोबर आर्थिक मदतही झाली आहे. वळवई, खांडोळा येथे पंचायतघराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. वळवई, केरी, सावईवेरे येथे क्रीडा मैदाने बांधली गेली आहेत. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघात 12 बालवाडी इमारती बांधल्या आहेत. प्राथमिक शाळांमध्ये आवश्‍यक सोयी उपलब्ध केल्या आहेत. 
 
माशेलमधील कला मंदिर, माशेलचा कदंब बस स्टॅण्ड, मार्केट प्रकल्प, बाणस्तारीचा मार्केट प्रकल्प, म्हार्दोळचा मार्केट प्रकल्प तसेच ओपा पाण्याची पाईप लाईन आदी महत्त्वाची कामे पूर्ण झालेली नसून त्या कामांना सरकारची मंजुरी मिळाली आहे.

झालेली विकासकामे
  • माशेल-बाणस्तारी तसेच प्रियोळ मतदारसंघात रस्त्यांचे रुंदीकरण. 
  • खांडोळा वळवई पंचायत घराचे बांधकाम 
  • 12 बालवाडी बांधकाम 
  • तळी, विहिरी बांधकामे 
  • शिमगोत्सव, धालो मांडाचे नूतनीकरण. 

न झालेली कामे
  • माशेलचा कदंब बसस्टॅण्ड, कलामंदिर 
  • खांडोळा महाविद्यालयाची इमारत 
  • बाणस्तारीचे व म्हार्दोळचे मार्केट बांधकाम.  


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: