वाळपई, ता. 27 ः वाळपई मतदारसंघाचे आमदार विश्वजित प्रतापसिंह राणे यांनी गेल्या पाच वर्षांत वाळपई शहराबरोबरच ग्रामीण भागातसुद्धा विविध विकासकामे पूर्ण केली आहेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची बहुतेक कामे पूर्ण केली आहेत. वाळपई पालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांतील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण झाले. वाळपईत डॉ. आमशेकर पुलापासून ते पेट्रोल पंपापर्यंत वाळपई, फोंडा व पणजी मुख्य रस्ता आदी रस्त्यांचे रुंदीकरण व सौंदर्यीकरणही पूर्ण झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शोभेच्या झाडांची लागवड व उंच विद्युत दिवे उभारण्यात आले आहेत.
वाळपई बाजारात जुनी मार्केट इमारत मोडून त्याजागी सुधारित नवीन मार्केट उभारण्याचे काम सुरू झाले आहे. ते पूर्ण झाल्यावर येथील सुमारे 35 व्यापाऱ्यांना नवीन प्रशस्त जागाही मिळणार आहे तसेच नवीन प्रशासकीय इमारतीची काम सुरू असून त्यात नगरपालिका कार्यालय, सिनेमागृह, वातानुकूलित सभागृह, भाजी मार्केट अशी विविध सोयी सुविधा उपलब्ध होणार आहे. वाळपई बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी बालोद्यान, पार्किंग व्यवस्था, सभागृह, दुकाने अशा सुविधा असणार आहेत. वाळपईतील नवीन आधुनिक 120 खाटांचे इस्पितळ अंतिम टप्प्यात आहे. कचरा समस्येवर उपाय म्हणून कचरा प्रकल्पही येथे उभारण्यात येत आहे.
पालिका प्रभागातील सर्व क्षेत्रात हॉटमिक्स रस्ते, गटारे, गणपती विसर्जन पायऱ्या अशी कामे पूर्णत्वास नेली आहेत. खोतोडे पंचायत क्षेत्रात खोतोडे व वेळगेत ग्रामीण आरोग्य केंद्र सुरू केले आहे. खडकीतील श्रीराम हायस्कूलमध्ये बालरथ योजना कार्यान्वित केली आहे. तसेच स्मशानभूमीचे काम ही पूर्ण झाले आहे. सार्वजनिक विहिरी पंचायतींमार्फत दुरुस्त झाल्या आहेत. गुळेली पंचायतीत अत्याधुनिक साधन सुविधांनी परिपूर्ण विद्यालयाचे काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे.
नगरगाव पंचायत क्षेत्रातील सर्व गावांत रस्ते पूर्ण केले आहेत. देरोडे-हेदोडे पूल पूर्ण झाला असून साट्रेचा पूलदेखील पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. धावे-वाळपई नवीन बगल रस्त्याचे कामही सुरू असून त्यामुळे वाळपईत जाण्यासाठी अनेक गावातील लोकांना अत्यंत जवळचा रस्ता मिळणार आहे. आंबेडे येथील दूध सोसायटीच्या नवीन इमारतीचेही काम पूर्ण झाल्यामुळे नगरगाव दूध संस्थेला नवीन प्रशस्त कायमस्वरूपी जागा मिळाली आहे. अनेक गावात पाणी पुरवठा प्रकल्प पूर्ण केले आहेत. या मतदारसंघात अजूनही काही गावांतील वीजवाहिन्यांची दुरुस्ती झालेली नाही. या वीजवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. तेथे नवीन वीजवाहिन्या घालणे आवश्यक बनले आहे. तसेच या भागात वरचेवर वीज खंडित होते तसेच काही भागात टॅंकरद्वारे पाणी पुरविले जाते.
झालेली कामे - - नवीन बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात
- - सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण
- - नवीन हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात
- - प्रशासकीय इमारतीचे काम सुरू
- - गुळेलीत अत्याधुनिक साधन सुविधांनी परिपूर्ण विद्यालय
- - मार्केटचे काम सुरू
न झालेली कामे - - वीजवाहिन्यांची दुरुस्ती
- - काही भागात अनियमित पाणी पुरवठा
- - करंझोळ, कुमठळमधील जमिनीची मालकी हक्काचा प्रश्न