राज्यातील मद्यालये बंद
प्रतिनिधी
Saturday, January 28, 2012 AT 03:00 AM (IST)
पणजी, ता. 27 : आचारसंहितेच्या नावाखाली अबकारी खात्याकडून होणाऱ्या कथित सतावणुकीच्या निषेधार्थ आज राज्यातील घाऊक मद्यविक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली. पणजीत फक्त दोनच दुकाने सुरू होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करताच अबकारी खात्याने प्रत्येक तालुक्यात गस्तीपथकांची नेमणूक करून बेकायदा मद्यविक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू केली. राज्यभरातील मद्याच्या दुकानांवर छापे टाकण्याचे सत्र सुरू आहे. या छाप्यांचा निषेध करण्यासाठीच आज मद्याची दुकाने बंद ठेवली गेली.
दिवसभरात अकरा ठिकाणी छापे अबकारी खात्याने आज दिवसभरात अकरा ठिकाणी छापे टाकले. यापैकी फोंड्यात 10 हजार रुपयांचे 265 लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे. अबकारी खात्याने आज सांग्यात पाच ठिकाणी, सासष्टी व काणकोणात प्रत्येकी दोन तर फोंड्यात एक छापा टाकला.
एकूण 23 लाखांचे मद्य जप्त 24 डिसेंबरपासून ते आजपर्यंत अबकारी खात्याने उत्तर गोव्यात 138 तर दक्षिण गोव्यात 224 मिळून एकूण 362 ठिकाणी छापे टाकले आहेत. यात 147 गुन्हे नोंदविले आहेत. विविध छाप्यांमध्ये एकूण 23 लाख रुपयांचे 22 हजार 715 लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे.
|
|
|