'ऑफ सीझन'मध्ये हॉटेलांना करात 50 टक्के सूट
प्रतिनिधी
Friday, April 06, 2012 AT 01:32 AM (IST)
पणजी, ता. 5- राज्यातील हॉटेलांना बिगर हंगामात करात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय सरकारने आज घेतला. तशी मागणी टूर ऍण्ड ट्रॅव्हल असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्पपूर्व चर्चेच्यावेळी केली होती. या निर्णयामुळे मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये हॉटेलांना निम्म्या दराने कर भरावा लागणार आहे.
संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी याबाबत सांगितले, की हंगामात चार्टर्ड विमानाने अनेक पर्यटक येतात. हंगामात अनेक तारांकित हॉटेलांना पर्यटकांची पसंती असते. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इतर हॉटेल चालकांना अनेक योजना राबवाव्या लागतात. त्यात मोफत भोजनासह सहलीची सोय यापासून तीन दिवसाचे पैसे भरून चार दिवस रहा, अशा योजनांचाही समावेश असतो. अशा योजनांमुळे हॉटेल चालकांना नफा न होता केवळ खर्चाइतकीच रक्कम वसूल होते. त्यामुळे ऐषोराम कर, मूल्यवर्धित कर, सेवा कर यात बिगर हंगामात सूट द्यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यावेळी त्यांनी ऐषोराम कर 50 टक्क्यांवर आणण्याचा विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार सरकारने हा निर्णय घेतलेला आहे.