पण

जी, ता. 6 - राज्यातील मारुतीच्या व रामाच्या मंदिरांमध्ये धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. मारुतीला तेल अर्पण करून त्याचे दर्शन घेण्यासाठी सर्वच मंदिरामध्ये भाविकांची गर्दी उसळली होती. मारुतीगड येथील मारुती मंदिरात सकाळी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
काही वर्षांपूर्वी राज्यात हनुमान जयंतीच्या उत्सवाची व्याप्ती मर्यादित होती. परंतु आता महाशिवरात्री, नवरात्रोत्सवप्रमाणेच हनुमान जयंतीही साजरी केली जात आहे. सकाळी धार्मिक विधी, सायंकाळी पालखी मिरवणूक व रात्री कीर्तन अथवा एखादा नाट्यप्रयोग असे उपक्रम आज सर्वत्र पार पडले. पणजीत मारुतीगड, कदंब बसस्थानक तथा मिरामार येथील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळली होती.
याव्यतिरिक्त भाटले येथील श्रीराम मंदिर, मोरजी येथील हनुमान संस्थान, वेरे येथील शांतादुर्गा संस्थान, मुरमुणे सत्तरी येथील हनुमान मंदिर, मांद्रे, दवर्ली, पर्वरी वेताळ महारुद्र संस्थान, साखळी बाजारपेठ, शिवोली भिंगेश्वर देवस्थान येथे मोठ्या प्रमाणात हनुमान जयंती साजरी करण्यात आली.
पर्वरी येथील वेताळ महारुद्र संस्थानात 12 एप्रिलपर्यंत हनुमान जयंतीचे कार्यक्रम चालणार आहेत. अमृतमोहिनी, अश्रूंचे झाले अमृत व पवित्र नाते हे तीन नाट्यप्रयोग हनुमान जयंतीनिमित्त या मंदिरात होणार आहेत.