सात आमदारांची मंत्रिपदी वर्णी; रविवारी विस्तार
प्रतिनिधी
Friday, April 06, 2012 AT 01:34 AM (IST)
पणजी, ता. 5 - राज्य मंत्रिमंडळाचा येत्या रविवार 8 एप्रिल रोजी विस्तार होणार असून, सात आमदारांना मंत्रिपदे दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज खाण खात्यात आल्यावेळी पत्रकारांना दिली. सरकारातील सर्व घटकांत एकजूट असल्याचा दावा त्यांनी केला.
गेल्या 9 मार्च रोजी राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी कांपाल मैदानावर झाला होता. परंतु मंत्रिमंडळ विस्तारात शपथविधी कार्यक्रम राजभवनवरच होईल, असे त्यांनी सांगितले. मंत्रिपद कोणाला मिळेल हे सांगण्यास त्यांनी नकार दिला, शक्यतो येत्या शनिवारी घोषणा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मंत्रिपद कोणाला द्यायचे हे आपण नक्की केले असले, तरी उद्या गुड फ्रायडेची सुटी असल्यामुळे आमदारांशी बातचीत करून अंतिम निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, महादेव नाईक, दिलीप परुळेकर, आवेर्तान फुर्तादो, एलिना साल्ढाणा, मिलिंद नाईक, दीपक ढवळीकर, तसेच सांगे अथवा केपे तालुक्यातील आमदाराला मंत्रिपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
लोकायुक्ताला 15 दिवसात
मान्यतेची पर्रीकरांना अपेक्षा
लोकायुक्त विधेयक 2011 ला राष्ट्रपतींची मान्यता येत्या 15 दिवसांत मिळेल, अशी आशा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. केंद्र सरकारचे लोकपाल विधेयक संमत होईल त्यावेळी त्यासंदर्भात विचार करता येईल, परंतु तोपर्यंत गोव्याच्या विधेयकाला मंजुरी का मिळू नये? असा प्रश्न उपस्थित करीत केंद्रीय अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तरे राज्य सरकार उत्तर देणार असून, विधेयकाला मान्यता मिळवून घेण्यासाठी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव पाठपुरावा करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या पंधरा दिवसात गोवा लोकायुक्त विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात लोकपाल मंजूर झाले तरी लोकायुक्त राहायला काही हरकत नाही, फक्त जेथे केंद्र व राज्य सरकारात संघर्ष होईल, तेथे सुधारणा करता येतील, असे ते म्हणाले.