
पणजी, ता. 6 (प्रतिनिधी) ः गोव्यात गुड फ्रायडेनिमित्त वेगवेगळ्या भागातील चर्चमधून आज प्रार्थना झाल्या, शांतीपूर्ण मिरवणूकही काढण्यात आली. या प्रार्थना, मिरवणुकीसाठी कॅथॉलिक बांधवांची चर्चमध्ये एकच गर्दी उडाली होती. ज्येष्ठांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनी चर्चमधील प्रार्थनातून सहभागी होत क्रूसावरील येशू ख्रिस्ताचे दर्शन घेतले.
येशू ख्रिस्ताला क्रूसावर मारल्याचा दिवस म्हणून गुड फ्रायडेचे पालन केले जाते. गोव्यात ख्रिस्ती बंधू, भगिनीबरोबर हिंदू व अन्य धर्मीय नागरिक गुड फ्रायडेच्या मिरवणुकीत सहभागी होऊन येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहतात. आजही पणजीतील मेरी इमॅक्युलेट, डॉन बॉस्को, सांतीनेज चर्चमधील प्राकारात विशेष मंडपात प्रार्थना झाल्या. त्यानंतर चर्चमधून रांगेत येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेसह पालखीतून मिरवणूक निघाली. हजारो नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. विकएंडला राज्यात आलेल्या पर्यटकांनीही गुड फ्रायडेच्या प्रार्थनांना हजेरी लावली होती. येत्या रविवारी ईस्टर संडेनिमित्त पुन्हा प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले असून, इस्टरनिमित्ताने गोव्यात विशेष कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.