Last Update:
 
मुख्य पान

चोऱ्यांनी हैराण चोडणवासीयांचे रास्ता रोको
प्रतिनिधी
Friday, April 06, 2012 AT 01:31 AM (IST)
Tags: goa,   gomantak,   crime
चोडण, ता. 5- सततच्या चोऱ्यांमुळे हैराण झालेल्या चोडणवासीयांनी आज (गुरुवारी) गावणवाडा-चोडण येथे मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करून आपला निषेध नोंदवला. सकाळी साडेनऊ वाजता सुरू करण्यात आलेले हे रास्ता रोको आंदोलन पोलिसांनी दिलेल्या सुरक्षेच्या आश्‍वासनानंतर दुपारी एक वाजता मागे घेण्यात आले. चोडणवासीयांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात भाग घेतला.
चोडण येथे काल रात्री रॉकी डायस, एव्हरिस्टा डायस, कॅजेटन वाझ व तिओफिल वाझ यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चोरी केली. एकाच रात्री चौघाजणांच्या घरात चोरी करून या चोरट्यांनी हजारो रुपयांचा ऐवज चोरला. विशेष म्हणजे चोरट्यांनी चोरी करण्यासाठी तिओफिल वाझ यांना सुऱ्याचा धाक दाखवल्यावर भीतीने त्यांची गाळण उडून त्या बेशुद्धच पडल्या. सकाळी चौघाजणांच्या घरातील हा चोरीचा प्रकार अन्य गावातील लोकांना समजला. चोडण गावात सध्या चोऱ्यांचे सत्रच सुरू असून, येथील काही लोकांना या चोरट्यांनी लुबाडले आहे.
पोलिस आऊटपोस्ट असूनही एकाच गावात चार ठिकाणी चोऱ्या झाल्याचे समजल्यावर गावातील लोकांनी संताप व्यक्त केला. यावेळी नागरिकांना जमवण्यासाठी चर्चचा घंटानाद करण्यात आला. त्यानंतर गावातील सर्व नागरिक गावणवाडा येथे जमले आणि त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोकोचा निर्णय घेतला.
चोडण गावात चोऱ्या झाल्याचे आणि नागरिकांनी रास्ता रोको केल्याचे समजल्यावर पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी जुने गोवेचे पोलिस निरीक्षक एडविन कुलासो यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. मयेचे आमदार तथा विधानसभेचे उपसभापती अनंत शेट, तसेच उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक विजयसिंगही आंदोलनस्थळी पोचले. श्‍वानपथकाचा वापर करून चोरट्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, चोरटे काही सापडू शकले नाहीत. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चोडण गावातील लोकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची मागणी केली. तसेच ठोस आश्‍वासन दिल्याशिवाय रस्ता मोकळा करण्यास नकार दिला. "लोकांच्या सुरक्षेसाठी आधी उपाय योजा आणि मगच बोला', असा आग्रह नागरिकांनी धरला. गावातील सुरक्षेला पहिले प्राधान्य हवे असे, आमदार अनंत शेट यांनीही सांगितले. पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी लोकांना पोलिसांकडून आवश्‍यक सहकार्य मिळेल, असे आश्‍वासन दिले.
त्यानंतर फादर गॅब्रिएल कुतिन्हो, सरपंच प्रसाद चोडणकर, कन्झ्युमर फोरमच्या एस्परांका रॉड्रिग्ज, माजी सरपंच प्रेमानंद म्हांबरे यांनी पोलिसांना विविध सूचना केल्या. अन्य ग्रामस्थांनीही सुरक्षेच्यादृष्टीने पर्याय सुचवले. सुरक्षेसंबंधी पोलिस अधिकाऱ्यांकडे विविध मागण्या केल्यानंतर आणि पोलिसांनी याप्रकरणी लक्ष घालून आवश्‍यक कार्यवाहीचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला.
दरम्यान, जुने गोवे पोलिसांनी चोडण भागात गस्त वाढवण्यावर भर दिला असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: