पणजी, ता. 6 - तासन्तास टीव्हीवर कार्टून्स पाहणे, संगणकावर गेम्स खेळणे, यामुळे मुलांमध्ये दृष्टिदोष वाढत असून मुलांचे डोळे सांभाळा, असा सल्ला नेत्रतज्ज्ञांनी दिला आहे. गेल्या नऊ महिन्यात आरोग्य खात्याने राज्यात केलेल्या शालेय तपासणीत 799 विद्यार्थ्यांना दृष्टिदोष असल्याचे आढळून आले आहे.
राज्यातील 264 शाळांतील 27607 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती, तर 2010- 11 मध्ये केलेल्या तपासणीत दृष्टिदोष असलेल्या 448 विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. पण हे प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांर्गंत शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे देण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षांत 256 विद्यार्थ्यांना चष्मे वितरित करण्यात आले आहेत.
काही विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष हा आनुवंशिक आहे. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या सवयीमुळे दृष्टिदोष झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात डोळे तपासणीसाठी येणाऱ्या लहान मुलांचे प्रमाणही वाढत आहे. मैदानात खेळणारी मुले आता टीव्ही व संगणकामध्ये डोके खुपसून बसू लागली आहेत. त्याचा परिणाम त्यांच्या दृष्टीवर पडत आहे. टीव्ही किंवा संगणकासमोर तासन्तास बसून राहिल्याने डोळ्यावर ताण येतो. डोळ्याची उघडझाप कमी झाल्याने ते कोरडे पडतात. तसेच मुले अगदी जवळ जाऊन टीव्ही पाहत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. तसेच एकसारखे संगणकाच्या स्क्रीनकडे बघत राहिल्याने दृष्टिदोष वाढतो. याला "कम्प्युटर व्हीजन सिंड्रोम' म्हणतात. यामुळे मानदुखी, डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ आदी त्रास जाणवतो. जे लोक संगणकावर तीन तास व त्याहून अधिक वेळ घालवतात, अशा 90 टक्के लोकांना दृष्टिदोष होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. घराघरांत आता संगणक, टीव्ही असल्याने मुलांना संगणकापासून दूर ठेवणे अवघड जात आहे. यामुळे बालवयातच मुलांना चष्मा लागत आहे.
दृष्टिदोष टाळण्यासाठी कमीत कमी 3 मीटर अंतर ठेवून टीव्ही पाहा. तर संगणक 35 सें.मी. अंतरावरून हाताळा, असा सल्ला गोमेकॉतील नेत्रतज्ज्ञ डॉ. उगम उसगावकर यांनी दिला आहे. पूर्ण काळोखात संगणक किंवा टीव्ही पाहू नका. पुस्तके वाचतानाही अंतर ठेवा, असे डॉ. उसगावकर यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात मोतीबिंदूचे रुग्ण अधिक आहेत. आरोग्य खात्याने केलेल्या तपासणीत मोतीबिंदूचे नवीन 2826 रुग्ण आढळून आले आहेत. गोमेकॉत रोज 15 मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.
दृष्टिदोष टाळण्यासाठी ही काळजी घ्या... - संगणकाच्या स्क्रीनकडे एकटक बघू नका
- पाच-सहा सेकंदाला डोळ्याची उघडझाप होऊ द्या
- टीव्हीपासून कमीत कमी 3 मीटर अंतर ठेवा
- संगणक स्क्रीनपर्यंतचे अंतर 30 ते 35 सें.मी ठेवा