येत्या पाच वर्षात वृद्धांची संख्या होणार मुलांपेक्षा अधिक
प्रतिनिधी
Sunday, April 08, 2012 AT 02:00 AM (IST)
पणजी, ता. 7 - येत्या पाच वर्षात 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धांची संख्या मुलांपेक्षा अधिक होणार आहे. या वृद्धांची शुश्रूषा, उपचार तथा त्यांची काळजी घेण्यासाठी आतापासूनच खास व्यवस्था तथा यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचा सूर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या परिसंवादात व्यक्त झाला.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आज जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. "चांगले आरोग्य : वयाला जीवनाची जोड' या संकल्पनेवर आधारित यंदाचा आरोग्य दिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त गोवा वैद्यकीय महाविद्यालयात एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. "वृद्ध नागरिक व त्यांच्या आरोग्याच्या समस्या' हा परिसंवादाचा विषय होता. डॉ. रामनाथ नेर्लेकर, डॉ. हेमांगिनी शहा, डॉ. जगदीश काकोडकर, जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधन अधिकारी डॉ. मधुर गुप्ता आदी मान्यवर या परिसंवादात सहभागी झाले होते.
"देशात आठ दशलक्ष वृद्ध'
परिसंवादात बोलताना डॉ. रामनाथ नेर्लेकर म्हणाले, "2009 साली जगात 6.8 अब्ज नागरिक वयोवृद्ध होते. 1980 नंतर या आकड्यात दुपटीने वाढ झालेली आहे. वृद्धांच्या संख्येत होणारी वाढ विचारात घेता आणखी 5 वर्षांनंतर मुलांच्या तुलनेत वृद्धांची संख्या वाढणार आहे. जगाच्या तुलनेत भारतातील चित्रही फारसे वेगळे असणार नाही. वृद्ध माणसे ही एक प्रकारची संपत्तीच असते. 2011 साली जपानमध्ये भूकंप व त्सुनामी झाल्यानंतर देशातील वृद्ध नागरिकांनी बरेच कार्य केलेले आहे. ही बाब विचारात घेता वृद्ध नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे अत्यावश्यक ठरते.
"केंद्राकडून कार्यक्रम जाहीर'
डॉ. हेमांगिनी शहा म्हणाल्या, "वृद्ध नागरिकांचे आरोग्य तथा उपचारासाठी केंद्र सरकारने भरीव योजना आखलेल्या आहेत. केंद्र सरकारने खास कार्यक्रमही जाहीर केलेला आहे. वृद्ध नागरिकांसाठी विविध जिल्ह्यात खास इस्पितळे स्थापन करण्यात येणार आहेत. गोव्यात मात्र इस्पितळ स्थापण्याचा विचार नाही.
"80 टक्के वृद्ध ग्रामीण भागात'
जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधन अधिकारी डॉ. मधुर गुप्ता म्हणाल्या, "वृद्ध नागरिकांची संख्या भारतात वाढत आहे. परंतु वृद्धांच्या एकूण संख्येपैकी 80 टक्के वृद्ध ग्रामीण भागात राहतात. यामुळे वृद्ध नागरिकांसाठी ग्रामीण भागात अधिकाधिक सुविधा उभारण्याची गरज आहे. 2050 साली वृद्ध नागरिकांची संख्या तिप्पट बनेल. 2025 साली ती दुप्पट असेल. ही संख्या विचारात घेऊन पावले उचलायला हवीत.
डॉ. जगदीश काकोडकर यांनी गोवा सरकारच्या वृद्धांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. डॉ. एस. एम. बांदेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
"गोमेकॉ'त वृद्धांच्या उपचारावरील पदव्युत्तर अभ्यासक्रम
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात येत्या वर्षात वृद्धांच्या उपचारावर (जेरेटिक्स) आधारित पदव्युत्तर (एमडी) अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. भारतातील काही वैद्यकीय महाविद्यालयात हा अभ्यासक्रम पूर्वीच सुरू झालेला आहे. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातही अशाच स्वरूपाचा पदविका अभ्यासक्रम असल्याची माहिती मान्यवरांनी यावेळी दिली.