Last Update:
 
गोवा

पर्यटकांना निवासावर 30 ते 50 टक्के सवलत
प्रतिनिधी
Sunday, April 08, 2012 AT 02:30 AM (IST)
पणजी, ता. 7 - पर्यटकांनी उन्हाळ्यात येऊन गोव्यातील समुद्रकिनारी तळ ठोकावा आणि पावसाळ्यात येऊन पावसाची रम्य रूपे पाहावी म्हणून राज्य पर्यटन विकास महामंडळाबरोबरीने खासगी हॉटेल्स सुसज्ज होऊ लागली आहेत. सरकारने ऐषआराम, मूल्यवर्धित करात ऑफ सीझन सवलत दिल्याचा फायदा येत्या पावसाळ्यात खासगी हॉटेलवाले पर्यटकांपर्यंत पोचवणार आहेत, तर पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानावर 30 ते 50 टक्के सवलती जाहीर झाल्या आहेत.
विकएंड पर्यटन गोव्यात पॉप्युुलर होत असून, त्याचा फायदा घेऊन एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या पावसाळी पर्यटनाला पुन्हा एकदा संजीवनी देण्यासाठी यंदा पर्यटन विकास महामंडळ, खासगी हॉटेल उद्योजकांनी कंबर कसली आहे. पावसाळ्यात देशी पर्यटकांवरच लक्ष केंद्रित केले जात असून, 16 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळी मोसमासाठी पर्यटन विकास महामंडळाने भरीव सवलतींचे दरपत्रक निश्‍चित करून ते संकेतस्थळावरून देश विदेशात पोचवले आहे. पर्यटन महामंडळ आपल्या निवासात राहणाऱ्यांना पर्यटकांसाठी कमी दरात महामंडळाच्या मालकीच्या नौकेतील जलसफरीवर, उत्तर व दक्षिण गोवा सफरींचा आनंद लुटण्यास देते. सकाळचा मोफत ब्रेकफास्ट देण्याची सवलतही ऑफ सिझनमध्ये मिळते.
या पावसाळ्यात पर्यटन महामंडळाच्या सर्व निवासात राहणाऱ्यांना 300 पासून 2500 ते 3000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. (तपशीलवार माहितीसाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे संकेतस्थळ पाहावे) पर्यटन विकास महामंडळाच्या निवासस्थानासाठी ऑनलाइन बुकिंगची सोय आहे.
पावसाळ्यात खासगी हॉटेलवाले 30 ते 50 टक्केपर्यंत निवासावर सवलती देतील, तसेच जास्त संख्येने, गटाने, एकत्र येणाऱ्या पर्यटकांना आणखी सवलत मिळू शकते, अशी माहिती हॉटेल उद्योजकांच्या सूत्रांनी दिली. परिषद पर्यटनाला पावसाळ्यात वाव देण्यासाठी या सवलतींचा उपयोग करण्याचा उद्योजकांचा इरादा आहे.

समुद्रकिनारी पर्यटन पावसाळ्यात अधिक स्वस्त
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर उन्हाळा, हिवाळ्यात गर्दी उसळलेली असते. पावसाळ्यात विदेशी पर्यटक येत नसल्यामुळे समुद्रकिनारे सुने सुने असतात, निवासही रिकामी जातात, हे लक्षात घेऊन उत्तर गोव्यातील कळंगुट, मिरामार, तर दक्षिण गोव्यातील कोलवा समुद्रकिनारी असलेल्या पर्यटन विकास महामंडळाच्या निवासावर 500 ते 3000 रुपयांपर्यंतची सवलत जाहीर करण्यात आली आहे. भर पर्यटन मोसमात आकारल्या जाणाऱ्या दरांपेक्षा समुद्रकिनारी निवासावर 40 ते 50 टक्के कमी दर आकारण्यात येणार आहेत.

आज सांतामोनिकावर ईस्टर
पर्यटन विकास महामंडळाच्या सांतामोनिका नौकेवर उद्या (ता. 8) ईस्टर संडेनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. हॉकी पॉकी डान्स, ऑस्ट्रिच कॅलिप्सो, कार्निव्हल शो, हॅन्ड शो कार्यक्रमांबरोबरीने डीजे, नृत्य, वादन होणार आहे, तसेच बक्षिसांचीही यावेळी खैरात केली जाणार आहे. जोडप्यासाठी 1200 रुपये, तर एकट्यासाठी 700 रुपये असे या कार्यक्रमाचे प्रवेशशुल्क आहे.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: