Last Update:
 
विशेष लेख

शांततेसाठी परजली शब्दांचीच शस्त्रे! (विशेष लेख)
डॉ. प्रमोद तलगेरी
Wednesday, April 18, 2012 AT 03:45 AM (IST)
देशाचे परराष्ट्र धोरण, राजनैतिक भूमिका यांच्याबाबत काही मोजके अपवाद वगळता आपल्याकडील साहित्यिक आणि कवी अलिप्त, उदासीन असतात. कवितेने एखाद्या राजकीय मुद्‌द्‌यावरील चर्चेने देश ढवळून निघावा, ही तर अविश्‍वसनीय अशीच गोष्ट वाटेल. मात्र जर्मनीत असे घडले आहे. गुंथर ग्रास या नोबेलप्राप्त साहित्यिकाने लिहिलेल्या एका कवितेने "राजकीय सावधगिरी'च्या (पोलिटिकल करेक्‍टनेस) जर्मनीच्या पवित्र्यालाच हादरा दिला आहे. इस्रायलचे आक्रमक धोरण, त्या देशाचा आण्विक कार्यक्रम आणि जर्मनीकडून त्या देशाला आण्विक पाणबुड्या दिल्या जाणार असल्याचे वृत्त, यामुळे ग्रास अस्वस्थ झाले आणि या अस्वस्थतेला वाट मिळाली ती कवितेतून. "व्हॉट मस्ट बी सेड' हे कवितेचे शीर्षकच बोलके आहे. या विषयावर मौन बाळगणे केवळ अशक्‍य आहे, असे या कवीला वाटले.

चार एप्रिल रोजी जर्मनी व इटलीतील वृत्तपत्रांत ती कविता प्रसिद्ध झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. इस्राईलची आण्विक सत्ता म्हणजे जागतिक शांततेपुढील मोठा धोका आहे, असे त्यात ग्रास यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. त्यांच्या या कवितेने जर्मनीत एवढी खळबळ का माजली? याचे कारण सापडते ते जर्मनीच्या अलीकडच्या इतिहासात. नाझींनी केलेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचा कलंक सत्तर वर्षांनंतरही जर्मनी वागवतो आहे. सामूहिक विवेकबुद्धीला लागलेली टोचणी या देशाला स्वस्थ बसू देत नाही, एवढेच नव्हे, तर इस्राईलच्या विरोधात काही भाष्य करणे कटाक्षाने टाळले जाते. इस्राईलवर टीका केल्यास ज्यूविरोधी असा शिक्का बसेल म्हणून या बाबतीत सावधगिरी बाळगली जाते. ही सावधगिरी काही वेळा तर अगदी हास्यास्पद अशा टोकाला गेली होती. याचे एक उदाहरण म्हणजे "मर्चंट ऑफ व्हेनिस' या शेक्‍सपिअरच्या नाटकाचा प्रयोग करण्यास जर्मनीत चक्क बंदी होती. कारण या नाटकात शायलॉक ही एका दुर्गुणी ज्यूची व्यक्तिरेखा आहे. जेव्हा प्रख्यात ज्यू अभिनेते गुस्ताफ ग्रंजेन्स यांनीच शायलॉकची भूमिका करण्याची तयारी दर्शविली तेव्हाच ही बंदी उठविण्यात आली!

विनाशाचा इशारा
नाझींच्या कृत्यांमुळे निर्माण झालेला जर्मनीतील अपराधभाव राजकारणातही इतक्‍या तीव्रतेने आढळतो, की इस्राईलच्या राजकीय, लष्करी धोरणांविरोधात काही बोलण्यास जर्मनीतील राजकीय नेते तयार नसतात. इस्राईल स्वसंरक्षणाच्या नावाखाली जी शस्त्रे जमवत आहे आणि आक्रमक अण्वस्त्र धोरण आखत आहे, त्याचे परिणाम केवढे भीषण आहेत, याची जाणीव कोणीतरी करून द्यायला हवी, असे ग्रास यांना वाटले आणि त्यांनी जर्मनीला या बाबतीत जागे करण्याचा प्रयत्न केला. "मस्ट बी सेड' या गुंथर ग्रास यांच्या कवितेने केवळ जर्मनीतच नव्हे, तर जगभर खळबळ उडाली. इस्राईलची तीव्र प्रतिक्रिया येणे साहजिकच होते; परंतु जगात इतरत्रही त्याचे पडसाद उमटले. ग्रास यांच्या कवितेला तात्कालिक निमित्त झाले ते जर्मनीकडून इस्राईलला पुरविण्यात येणाऱ्या आण्विक पाणबुड्यांचे. गेले काही महिने इराणच्या विरोधात इस्राईल गर्जना करीत आहे. या दोन देशांत युद्ध झाले तर त्यात इराणचा विनाश तर होईलच; परंतु इस्राईल व तेथील जनता यांचीही फार मोठ्या प्रमाणावर हानी होईल, हा धोक्‍याचा इशारा ग्रास यांनी दिला आहे. विवेकाचा स्वर त्यांच्या कवितेतून उमटतो. मानवतेच्या विरोधात काही घडत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठविणे, व्यक्त होणे हे साहित्यिकांचे कर्तव्यच आहे, हेही त्यातून सूचित होते. 84 वर्षांचा हा नोबेलविजेता कवी आजवर मौन बाळगल्याबद्दल स्वतःलाही दोष देतो. इस्राईलच्या आण्विक धोरणाला विरोध करणे म्हणजे इस्रायली जनतेला विरोध करणे नव्हे, हे गुंथर ग्रास स्पष्ट करतात. इस्रायली जनतेवर आपले मनापासून प्रेम आहे, याची ग्वाहीही देतात. आधीच जागतिक शांततेला तडे जाणाऱ्या घटना एकापाठोपाठ एक घडताहेत. इस्राईलच्या आण्विक धोरणामुळे तर तिच्या चिंधड्याच उडण्याचा धोका आहे, असा स्पष्ट इशारा ते देतात. पाश्‍चात्त्य जग इस्राईलच्या आक्रमक हालचालींबद्दल मूग गिळून गप्प राहत आहे, याबद्दल चीड व्यक्त करतात. इस्राईलच्या आण्विक तळांचीही तपासणी का होत नाही, हा प्रश्‍न उपस्थित करतात आणि जर्मनीच्या सत्ताधाऱ्यांना चार शब्द सुनावतानाच पाश्‍चात्त्य जगाचा दंभही उघड करतात.

राजसत्तेकडे दमनाची यंत्रणा असते. त्याद्वारा विरोध चिरडून टाकण्याची त्या यंत्रणेची प्रवृत्ती असते. फरक असतो तो फक्त पद्धतीचा. त्यामुळेच या सत्तेच्या पोलादी भिंतीला धडक देण्यास कोणी धजावत नाही. तसे करणाऱ्यांना फार किंमत मोजावी लागते. गुंथर ग्रास यांची कविता वाड्‌मयीनदृष्ट्या किती श्रेष्ठ आहे, ही समीक्षकी चर्चा त्यामुळेच येथे व्यर्थ ठरते. त्या कवितेने राजकीय, सामाजिक चर्चाविश्‍व व्यापले, विवेकाला आवाहन केले आणि जगात सत्तेच्या गढ्या सांभाळणाऱ्यांसमोर काही महत्त्वाचे प्रश्‍न उपस्थित केले, हे महत्त्वाचे आहे. कवीच्या शब्दांना कसे मोल असते, याची चुणूक या घटनाक्रमांतून दिसली... म्हणूनच योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी बोललेच पाहिजे. ग्रास यांच्या शब्दांतच सांगायचे तर "इट मस्ट बी सेड'...
(लेखक इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हर्सिटीचे कुलगुरू आहेत.)


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: