एस. जी. नाईक, केपे

अचानक जीवनातील वाईट परिस्थिती बदलून चांगले घडायला लागले, तर त्याला नशीब म्हटले जाते. काही जणांचे कष्ट करून करून जीवन बदलते. तसेच एखाद्या व्यक्तीच्या आगमनाने चांगल्या गोष्टी घडू लागल्या, की ती व्यक्ती नशीबवान समजली जाते. मग त्याच्या नावाचा उदोउदो होतो, परंतु कितीही कष्ट केले तरी काही जणांना लाभ होत नाही. तेव्हा त्या माणसाला नशिबावर विश्वास ठेवावाच लागतो. एखाद्या व्यक्तीच्या आगमनाने वाईट घटना घडल्या, तर त्याला कमनशिबी म्हणून हिणवले जाते.
काही वेळी अशी स्थिती नव्याने लग्न होऊन सासरी गेलेल्या कित्येक मुलींवर येते. नवीन स्वप्नं उराशी बाळगून ती घरात प्रवेश करते. तिला काय माहीत, की सासरी गेल्यावर काय घडणार ते! काही वेळा घडू नये त्या घटना अचानक घडायला लागतात आणि त्याचा दोष प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या नव्याने आलेल्या नवरीवर थापला जातो. बिचारीला जीवनच नकोसे होऊन जाते. तिची हेटाळणी होते. काही चांगले घडले तरी त्याकडे डोळेझाक केली जाते.
ेतेच जर नव्या नवरीच्या येण्याने प्रथमपासूनच चांगल्या घटना घडायला लागल्या, तर तिचे कोडकौतुक होते. तिला डोक्यावर घेऊन नाचविले जाते. शेजारीपाजारी, नातेवाईक सगळेजण तिची स्तुती करतात. "तू आल्याने घरात हे आले, तू आल्याने घरात ते आले. उद्योगधंदा फळफळला', असे म्हणायला सुरवात होते. याच्या उलट जर नव्या नवरीच्या येण्याने विपरीत घडले, तर तिला उठताबसता टोमणे मारले जातात. अशावेळी नवराही घरच्यांच्याच बाजूने होतो.
कुठल्या नवरीला वाटेल, की ती नवऱ्याच्या घरी गेल्यावर वाईट घडावे म्हणून? पण तसे घडल्यावर तिचाही नाइलाज होतो. ती अशा घटना थांबवू शकत नाही. अशावेळी निदान माणुसकीच्या भावनेने तिला घरच्यांनी सांभाळून घेतले पाहिजे. नाहीतर अशा मुलींचे लग्नानंतरचे आयुष्यच उद्ध्वस्त होऊन जाते. आपले लग्न न झालेलेच बरे होते, असे तिच्या मनाला वाटत राहते. म्हणूनच नशिबात घडणाऱ्या गोष्टी थांबवता येत नसल्या तरी, अशाप्रसंगी समाजाने योग्य भान राखणे गरजेचे आहे.