पणजी, ता. 9 ः कुठ्ठाळी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून प्रदेश महिला कॉंग्रेस अध्यक्ष सिंथिया डिसिल्वा यांना पसंती मिळण्याची दाट शक्यता असून रेमंड डिसा तसेच अन्य दोन उमेदवारांची नावेही आज झालेल्या कॉंग्रेस बैठकीत पुढे आली आहेत.
कुठ्ठाळी मतदारसंघासाठी कॉंग्रेस उमेदवाराची चाचपणी करण्यासाठी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी जगमितसिंग ब्रार व अखिल भारतीय कॉंग्रेस सचिव सुधाकर रेड्डी राज्यात आज दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत उद्या कुठ्ठाळी मतदारसंघात कॉंग्रेसची बैठक होण्याची शक्यता आहे.
कुठ्ठाळी मतदारसंघासाठी तीन-चार उमेदवारांची नावे कॉंग्रेसतर्फे विचाराधीन असून श्री. रेड्डी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस हाऊसमध्ये विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे तसेच प्रदेश कॉंग्रेस पदाधिकारी व अन्य नेते, कुठ्ठाळी मतदारसंघ गट समिती सदस्य, कार्यकर्त्यांची बैठक झाली. कुठ्ठाळीसाठी तीन-चार इच्छुकांचे प्रस्ताव पक्षासमोर असून येत्या 15 मेपर्यंत कॉंग्रेसच्या उमेदवाराची घोषणा होईल, अशी शक्यता प्रदेश कॉंग्रेसचे हंगामी अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केली. श्री. रेड्डी गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस नेत्यांची बैठक झाली परंतु श्री. ब्रार रात्री उशिरा पोचल्यामुळे बैठकीच्या एक-दोन फेऱ्या उद्या होतील, असे श्री. शिरोडकर यांनी सांगितले. कोणत्या उमेदवाराला प्राधान्य मिळेल त्यासंदर्भात श्री. शिरोडकर यांनी काही सांगितले नाही परंतु विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावललेल्या महिला कॉंग्रेस अध्यक्ष सिंथिया डिसिल्वा यांना मतदारसंघातील जातीय तसेच अन्य समीकरणे विचारात घेऊन प्राधान्यक्रम मिळण्याची शक्यता कॉंग्रेस सूत्रांनी व्यक्त केली. सिंथिया यांना उमेदवारी मिळाल्यास कुठ्ठाळी मतदारसंघात आजवर बहुसंख्यवेळा निवडून आलेले आमदार मावीन गुदिन्हो हिरिरीने निवडणुकीत काम करतील, असा विश्वास कॉंग्रेस नेत्यांना वाटतो. श्री. गुदिन्हो गोव्याबाहेर असून उद्या ते परतल्यानंतर त्यांना विचारात घेऊनच कुठ्ठाळीतील उमेदवारांचा अग्रक्रम ठरवला जाण्याची शक्यता आहे.
पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही
कुठ्ठाळी मतदारसंघ विधानसभा पोटनिवडणुकीची रीतसर अधिसूचना आज जारी झाली असून पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, अशी माहिती संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी दिली. दरम्यान, कुठ्ठाळी मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरीक्षक राज्यात दाखल झाले असून आणखी एक सर्वसाधारण निरीक्षक येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.