Last Update:
 
मुख्य पान

कला अकादमीत उलगडले "राग समय चक्र'!
(सांस्कृतिक प्रतिनिधी)
Thursday, May 10, 2012 AT 03:15 AM (IST)
Tags: goa,   gomantak,   kala acadamy
पणजी, ता. 9 - वासंतिक संगीत सभा उपक्रमांतर्गत राग समय सिद्धांतावर आधारित "राग समय चक्र' या आगळ्या कार्यक्रमाचे ख्याल प्रचारक संघ व कला अकादमी यांच्या वतीने अकादमीच्या कृष्णकक्षात आयोजन करण्यात आले. यामध्ये विक्रांत नाईक, सचिन तेली, वीणा मोपकर व प्रीतीमाला धावस्कर यांनी ललत, अल्हैया बिलावल, शुद्ध सारंग, मारवा, यमन, मालकंस, वसंत आदी रागांतील बंदिशी सादर करून रसिकांना रागसंगीताचा निर्भेळ आनंद दिला. प्रा. अनिल सामंत यांचे समयानुसार राग निर्मिती आणि त्या त्या रागाची वैशिष्ट्ये स्पष्ट करणारे निवेदन, यामुळे रसिकांना अधिक चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला.
सेझा ग्रुपने कार्यक्रम प्रायोजित केला होता. प्रमुख पाहुणे कला अकादमीचे अध्यक्ष आमदार विष्णू सूर्या वाघ यांच्या हस्ते, तसेच गोवा संगीत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मानब दास, ज्येष्ठ अध्यापक उल्हास वेलिंगकर, शशांक मक्तेदार व ख्याल प्रचारक संघाचे सचिन तेली यांच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून या उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना विष्णू सूर्या वाघ म्हणाले, आज संगीत क्षेत्रात मुबलक कलाकार व संगीताने शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. परंतु गुणवत्ता महत्त्वाची आहे व ती वाढविण्याच्या दृष्टीने अकादमीतर्फे प्रयत्न केले जातील. मुलांना छंद म्हणून संगीत शिकण्यासाठी पाठवणाऱ्या आई वडिलांची मानसिकता बदलली पाहिजे. करिअर म्हणून संगीताचे अध्ययन करण्याची गरज आहे. संगीत हे झटपट फळ देणारे माध्यम नाही. त्याला सातत्य, साधना लागते. ख्याल प्रचारक संस्थेची स्थापना या पार्श्‍वभूमीवर लक्षणीय वाटत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
"राग समय चक्र' कार्यक्रमाची सुरवात प्रातःकालीन गायिला जाणाऱ्या सकाळच्या पहिल्या प्रहरातील ललत या रागातील "जोगिया मोरे घर आ...' या बंदिशीने सचिन तेली व विक्रांत नाईक यांनी केली. वीणा मोपकर यांनी अल्हैया बिलावलमधील "जारे जारे जा खगवा' ही बंदिश समरसून म्हटली. प्रीतीमाला धावस्कर यांनी शुद्ध सारंगमधील "सखी री मोहे ना समझत समझ रे' ही बंदिश नीटपणे आळवली. विक्रांत यांनी मारवामधील "सुनसुन बतियॉं सगरी रतियॉं' ही आर्त बंदिश गाऊन छान वातावरण निर्मिती केली. त्यानंतर प्रीतीमाला यांनी यमन रागातील "तू जगमें शरम रखे मेरी...' ही बंदिश त्यातील लालित्यासह पेश केली. नंतर सचिन तेली यांनी मालकंस या धीरगंभीर रागातील "सुबन तेरे अब माई' ही बंदिश सादर केली.
प्रीतीमाला व वीणा यांनी सादर केलेल्या बसंत रागातील "कान्हा रंगवा न डालो' या सौंदर्यपूर्ण आणि आर्जवी बंदिशीने वातावरण भारून गेले व त्याला जोडून सर्व कलाकारांनी गायिलेल्या बसंतमधील बहारदार तराण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला.
प्रत्येक रागाच्या प्रकृतीनुसार रागसमयाला पूरक पार्श्‍वभागी स्क्रीनवर दाखविलेली स्लाईडस्‌ यामुळे कार्यक्रमाला आगळा रंग आला. प्रसिद्ध गायक व गुरू शशांक मक्तेदार यांची ही संकल्पना होती व त्यांचे मार्गदर्शन यासाठी लाभले होते. अमर मोपकर (तबला) व प्रसाद गावस (संवादिनी) यांची संयत साथसंगत पूरक ठरली. दीक्षा पुनाजी यांनी ऋणनिर्देश केला.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: