Last Update:
 
मुख्य पान

गटबाजीपासून दूर राहण्याचा सोनियांचा आदेश
वृत्तसंस्था
Thursday, May 10, 2012 AT 06:00 AM (IST)
नवी दिल्ली, 9 - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षातील खासदारांना गटबाजीपासून दूर राहण्याचे सांगत, पक्षामध्ये यापुढे कोणत्याही प्रकारचे अनुशासन खपवून घेतले जाणार नाही. तसेच सर्वांनी मिळून पक्ष पुढे नेणे गरजेचे असल्याचे सांगितले. 

काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या आज (बुधवार) झालेल्या बैठकीत बोलताना सोनिया गांधी यांनी हे वक्तव्य केले. या बैठकीला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँटनी, पक्षाचे महासचिव राहुल गांधी आणि अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्वीकारावा लागलेल्या पराभवानंतर काँग्रेसच्या संसदीय मंडळाची ही पहिलीच बैठक आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, ''पक्षाची धोरणे आणि सरकारच्या निर्णयांविषयी सार्वजनिक वक्तव्ये करणाऱ्या पक्षातील कोणत्याही सदस्यांना यापुढे माफ करण्यात येणार नाही. पक्षाची धोरणे आणि सरकारच्या निर्णयाविरोधात बोलणे, हे सध्या फॅशन बनले आहे. पक्षातील नेते आणि खासदारांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्वीकाराव्या लागलेल्या पराभवातून बोध घेण्याची गरज आहे. नुकत्याच घडलेल्या काही घटनांमधून विरोधी पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी आम्हाला शिकवण देऊ नये.''

या बैठकीत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत 'व्हिजन २०१४' असे नाव असलेला एक अहवाल मांडला. उत्तर प्रदेशातील पराभवाची कारणे शोधणार एक अहवाल संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी या बैठकीत जाहीर केला.


 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: