पणजी, ता. 9 ः मे महिन्यात शहरातील सांतिनेज खाडीतील असह्य दुर्गंधी सहन करीत नागरिकांना ये-जा करावी लागायची परंतु यंदा कांपाल परिसरात खाडीत झुळुझुळू पाणी वाहताना दिसत आहे, कचराही गायब झाला आहे. सांतिनेज खाडीच्या चैतन्यदायी रूपाचे साजरीकरण येत्या 13 मे रोजी "मदर्स डे'निमित्त गोवा फॉरगिव्हिंगने छोट्या नौका, होड्यांसह खाडीत उतरून करण्याचा निर्णय घेतला आहे.
मदर्स डे दिवशीच्या उपक्रमात कांपाल परिसरातील मुलांबरोबर खाडीच्या वरच्या भागात राहणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांनाही सहभागी करून घेण्यात येणार असून काही स्पर्धाही त्यादिवशी घेतल्या जातील.
सांतिनेज खाडीला नवा साज चढविण्यासाठी सर्वेक्षण सुरू असून वर्षभरात खाडीचा पूर्ण परिसर लख्ख झालेला दिसेल, असा विश्वास गोवा फॉरगिव्हिंग ट्रस्टचे अध्यक्ष आर्मांद गोन्साल्विस यांनी आज कांपाल कोर्टयार्ड हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
सांतिनेज खाडीला इतिहास आहे परंतु गेल्या काही वर्षात खाडीचे नाल्यात रूपांतर झाले आणि आता आम्ही खाडी मूळ रूपात आणण्यासाठी धडपड सुरू केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या महिनाभरात सांतिनेज खाडीची साफसफाई करण्यासाठी प्रयत्न करताना पणजी महापालिका आयुक्त संजित रॉड्रिग्ज यांनी या भागात वारंवार फिरून नागरिकांचा रागरंग जाणून घेतला. खाडीची पूर्ण माहिती मिळविण्यासाठी सर्वेक्षणास त्यांनी मान्यता दिली, खाडी व खाडीच्या एकूणच परिसराचा कायापालट करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे कामकाज करण्याचा इरादा व्यक्त केला, असे त्यांनी सांगितले.
कांपाल परिसरातील लोकांना बरोबर घेऊन खाडीचा पहिला टप्पा विकसित करताना खाडीवरील सांतिनेजकडे जाणाऱ्या छोट्या पुलाची डागडुजी होणार असून छोटा उड्डाणपूल, कठडे आणि नौकानयन सुविधा पुरविण्याचा पणजी महापालिकेचा प्रस्ताव असल्याची माहिती त्यांनी दिली. जागृतीमुळे या भागातील खाडी परिसरात कचरा टाकणे बंद झाले आहे तसेच मलनिस्सारण प्रकल्पातील शुद्ध केलेले लाखो लिटर पाणी खाडीत सोडले जात असल्यामुळे खाडीचे ओंगळवाणे रूप, दुर्गंधी गायब झाली असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
अभियंते मावरो रिबेलो यांनी सांतिनेज खाडीत फक्त जैविक कचरा असल्याची माहिती दिली. सुदैवाने रासायनिक कचरा खाडीत नसल्यामुळे खाडीतील गाळ उपसून भविष्यात काळजी घेतल्यास आरोग्यदायी जीवन पणजीवासीयांना जगता येईल, अशी खात्री त्यांनी दिली. जेरोनिमो आल्मेदा, तेर्रान्स मोनीज यावेळी उपस्थित होते.
पणजीत होणार "नोमोझो'
सांतिनेज खाडीत गाडीतून येऊन कचरा फेकणारे खूप आहेत परंतु त्यापेक्षा वाहनांची गर्दी वाढते आहे. ती कमी करण्यासाठी किमान कांपाल परिसरात महिन्याचा एक दिवस "नो मोटराईज्ड झोन' (नोमोझो) करण्याची कल्पना मदर्स डे दिवशी वास्तुरचनाकार ब्रायन सुवारीस नागरिकांना उलगडून ठेवणार आहेत. भविष्यात पणजीत काही ठिकाणी "नोमोझो' योजना, सायकल ट्रॅक साकार करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती श्री. सुवारीस यांनी दिली.