
पणजी, ता. 10 - सागर सुरक्षा कवच या नावाखाली तटरक्षक दल, सागरी पोलिस दल आणि पोलिस दलाने आज दुसऱ्या दिवशीही सराव केला. पण, सरावादरम्यान प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्याच्या प्रयत्नात मोठी वाहतूक कोंडी मात्र निर्माण झाली.
गोव्यात समुद्रमार्गे घातपाती कृत्य करणारे शिरू शकतात, असे अंदाज यापूर्वी गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केले होते. त्याचाच आधार घेत सुरक्षा यंत्रणांचा तयारीचा आढावा घेण्यासाठी नियमित स्वरूपात ही चाचणी घेण्यात येते. समुद्रातून अशा व्यक्ती येतील अशी माहिती यापूर्वी प्रसारित करूनही त्याला पकडण्याची रंगीत तालीम मात्र रस्त्यावर घेण्यात येते, हे विशेष!
पाण्यातून गोव्याच्या किनाऱ्यापर्यंत कोणी दहशतवादी पोचू नये यासाठी रंगीत तालीम घेणे सयुक्तिक ठरणार असतानाही दरखेपेला सरावात दहशतवाद्याची भूमिका दिलेल्यांना जमिनीवर पकडण्याचा सराव करण्यात येतो. प्रत्यक्षात किनारी भागातील सुरक्षा व्यवस्था म्हणजे नौकांतून वा पाण्याखालून कोणी किनाऱ्यावर पोचू नये याची खबरदारी घ्यायची आहे. त्याचा सराव गेल्या दोन दिवसात केल्याचे मात्र आढळून आले नाही.
ठिकठिकाणी आज सकाळपासून वरून आलेल्या आदेशानुसार रस्त्यावर अडथळे उभारून पोलिस वाहनांची तपासणी करत होते. दुपारी जरा त्यात शिथिलता आले होते. सायंकाळी पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली होती. कार्यालये सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्यावेळी ही तपासणी होत असल्याने, पणजीत वाहनांच्या मोठ्या रांगा पुलाच्या खाली लागल्याचे दिसून आले.
पर्वरीतही तपासणी पर्वरी (वार्ताहर) ः येथील कोकेरो सर्कल जवळ आज सागर कवचनिमित्त कडक सुरक्षा योजना राबवण्यात आली होती. प्रत्येक वाहनांची तपासणी करताना दोन डमी दहशतवाद्यांना पकडण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.