म्हापसा, ता. 16 : कोलवाळ तार शाळेतील मतदान केंद्राबाहेर एक पोलिंग एजंट आणि त्याच्या बरोबर झालेला किरकोळ मारहाणीचा प्रकार वगळता बार्देश तालुक्यातील 32 पंचायतीसाठी आज झालेले मतदार शांततेने पार पडले. कोलवाळ मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी करण्यात आल्या आहेत.
आज संध्याकाळी पावणेचारच्या दरम्यान एका उमेदवाराचे पोलिंग एजंट सूरज पंढरी नाईक हे मतदान केंद्राबाहेर आले व मतदान यादीतील काही नावासमोर टिक मार्क करीत होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर शांबा पुंडलिक गावकर हे होते.
यावेळी नामदेव गावकर, आशिष ऊर्फ प्रेमानंद अशोक चोडणकर व अशोक रघुनाथ चोडणकर हे तेथे आले. नामदेव गावकरने सूरज नाईक याच्या थोबाडीत मारले तर आशिष चोडणकर व अशोक चोडणकर यांनी शांबा गावकरला मारहाण केल्याची तक्रार म्हापसा पोलिसांत करण्यात आली आहे. अदखलपात्र गुन्हा या सदराखाली पोलिसांनी तक्रार नोंद केली आहे. अशोक चोडणकर यांनी सूरज नाईक व शांबा गावकर यांच्याविरुद्ध शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली आहे.
आज सकाळी वेगवेगळ्या पंचायत क्षेत्रांतील मतदान केंद्रांवर सुरवातीला मोठ्या रांगा दिसल्या नाहीत, मात्र नऊ वाजल्यानंतर मतदारांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आले. यामुळे काही मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागलेल्या दिसल्या. सकाळी 10 वाजेपर्यंत 25 ते 26 टक्के, दुपारी 12 वाजता 45 ते 45 टक्के तर दुपारी 2 वाजता शिवोली मार्ना, थिवी, सुकूर, हळदोणे, पेन्ह-द-फ्रान्स व सांगोल्डा या पंचायतीवगळता इतर पंचायतींमध्ये 60 टक्केपेक्षा जास्त मतदान झाले होते. सायंकाळी काही मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा दिसत होत्या. एकंदर मतदान 80 टक्केपेक्षा जास्त होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.
दुपारी 2 वाजता हणजूण 62.81, हडफडे 72.92, आसगाव 63.54, कामुर्ली 73.12, ओशेल 67.69, पर्रा 64.97, पोंबुर्फा 62.80, शिवोली मार्ना 55.91, सडये 62.76, सुकूर 58.02, वेर्ला-काणका 62.29, कोलवाळ 65.53, रेवोडा 72.43, नादोडा 71.57, पीर्ण 75.08, थिवी 57.76, सिरसई 68.94, अस्नोडा 62.24, हळदोणे 52.18, मयडे 64.36, नास्नोळा 61.77, बस्तोडा 63.01, उसकई 63.54, गिरी 63.79, कांदोळी 63.70, नेरूल 67.98, पेन्ह-द-फ्रान्स 54.45, पिळर्ण- 62.55, रेईस मागूस 64.29, साळगाव 66.14, साल्वादोर-द-मुंद 60.71 व सांगोल्डा 59.39 टक्के असे मतदान झाले.