नो एंट्री..., पुढे धोका आहे!
प्रतिनिधी
Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)
पणजी, ता. 16 ः तमीळ, तेलगू तसेच विदेशी भाषांतून निर्मिती केलेला "नो एंट्री - पुढे धोका आहे' हा चित्रपट मराठीतून रसिकांसमोर येणार असून, या चित्रपटाच्या चित्रीकरणास आज प्रारंभ झाला. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते कला अकादमी संकुलात समई प्रज्वलन झाल्यानंतर या चित्रपटाचा रीतसर मुहूर्त झाला.
गुरू ठाकूर यांचे संवाद असलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रेमनाथ राजगोपालन व निखिल सैनी यांची असून, निर्मितीसाठी सहकार्य विन्सन ग्राफिक्सचे संजय शेट्ये यांनी केली आहे. चित्रपट अभिनेते भरत जाधव, अंकुश चौधरी, अनिकेत विश्वासराव, क्रांती रेडकर, सई लोकूर, मानवा नाईक यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. मिलिंद अरुण कवडे हे चित्रपटाचे दिग्दर्शक असून, नकाश सरगम यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. सामला भास्कर यांची सिनेमॅटोग्राफी व साई ताम्हणकर, पंढरीनाथ कांबळे यांच्या भूमिका चित्रपटासाठी महत्त्वाच्या आहेत, असे श्री. शेट्ये यांनी सांगितले. श्री. जाधव, अनिकेत विश्वासराव तसेच अन्य कलाकार मंडळी मुहूर्ताच्या कार्यक्रमावेळी उपस्थित होती.
तीन मित्रांची ही कथा असून, प्रामाणिक पती कृष्णा व संशयित पत्नी, विवाहित असूनही पत्नीच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत दुसऱ्या मुलींच्या नादी लागणारा व नको तेथे प्रवेश करणारा प्रेम, तिसरा अविवाहित मित्र सनी गैरसमजुतीच्या जाळ्यात अडकल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी म्हणजे "नो एंट्री - पुढे धोका आहे' हा चित्रपट, अशी माहिती त्यांनी दिली.
चित्रपटाच्या काही भागांचे चित्रपट गोव्यात होणार असून, येत्या ऑगस्टपर्यंत चित्रीकरण पूर्ण करण्याचा निर्मात्यांचा इरादा आहे.
वीजमंत्री मिलिंद नाईक, माजी आमदार दामोदर नाईक, आमदार कार्लोस आल्मेदा, कला अकादमीचे अध्यक्ष आमदार विष्णू वाघ तसेच अन्य मंडळी यावेळी उपस्थित होती.