Last Update:
 
मुख्य पान

मिकींचा पाठिंबा सरकारने स्वीकारला: कुठ्ठाळीत गोविपाचा उमेदवार नाही
प्रतिनिधी
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
Tags: gomantak,   goa,   assembly,   bjp,   cuttali,   congress,   gvp
पणजी, ता. 16 - कुठ्ठाळी विधानसभा पोटनिवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाच आमदार मिकी पाशेको यांच्या गोवा विकास पार्टीचा पाठिंबा रीतसरपणे भाजप सरकारने स्वीकारल्यामुळे कुठ्ठाळीतील निवडणुकीला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गोवा विकास पार्टीच्या दोन आमदारांच्या पाठिंब्यामुळे सत्ताधारी आघाडीतील आमदारांची संख्या 27 वर गेली आहे.
सरकारने आमदार पाशेको यांच्या गोवा विकास पार्टीचा विनाअट पाठिंबा स्वीकारला अशी घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज (ता.16) येथे मांडवी हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत केली. गोवा विकास पार्टीने कुठ्ठाळी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार एलिना साल्ढाणा यांना पाठिंबा जाहीर करून, त्यांच्याविरुद्ध उमेदवार रिंगणात न उतरवण्याचा निर्णय आमदार पाशेको यांनी जाहीर केला.
गोव्यात येत्या 4 जून रोजी होणाऱ्या कुठ्ठाळी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवणार, दाबोळी विमानतळाच्या मुद्यावर सरकारला पेचात आणणार, असे कालपर्यंत गोवा विकास पार्टीचे नेते सांगत होते. युगोडेपा व गोविपा एकजुटीने जाणार अशाही घोषणा करण्यात आल्या होत्या. कुठ्ठाळी निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी उद्याचा दिवस बाकी असताना आज अचानक भाजपच्या उमेदवाराविरुद्ध गोविपाचा उमेदवार नसेल, अशी घोषणा केल्यामुळे श्रीमती साल्ढाणा यांची बाजू मजबूत झाली असली तरी, आजच्या मिकींच्या खेळीमागे खरोखरच प्रामाणिकपणा आहे का, अशी साशंकता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. या अनुषंगाने माजी मंत्री चर्चिल आलेमाव व युगोडेपाची भूमिका काय राहील त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
आजच्या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा, गोवा विकास पार्टीचे सरचिटणीस लिंडन मोंतेरो इत्यादी मंडळी उपस्थित होती. भाजप-मगो युतीला अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापनेवेळी गोवा विकास पार्टीने सरकारला पाठिंबा देत असल्याचे पत्र राज्यपालांना सादर केले होते, परंतु त्यावेळी आघाडीसंदर्भात विचार करायलाही वेळ नव्हता, पाठिंब्यासंदर्भात औपचारिक निर्णय घेतला नव्हता, असे पर्रीकर यांनी सांगितले. मात्र आता सरकारने गोविपाने देऊ केलेला सहकार्याचा हात स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. गोविपाने कुठ्ठाळी विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवार रिंगणात न उतरवण्याचा निर्णय आपल्याला कळवला असून, भाजपच्या उमेदवार श्रीमती साल्ढाणा यांचा विजय त्यामुळे निश्‍चित असल्याचे त्यांनी नमूद केले. कुठ्ठाळी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही राजकीय खेळी केल्याचा दावा पर्रीकर यांनी फेटाळून लावला.

पाठिंबा कधीच दिला होता : मिकी
गोवा विधानसभा निवडणूक जिंकलेल्या दिवसापासूनच सरकारला गोवा विकास पार्टीने पाठिंबा दिला होता, इतकेच नव्हे तर राज्यपालांना तसे दोन आमदारांच्या सहीचे पत्रही दिले होते. सरकारने पाठिंब्यासंदर्भात काही न कळवल्यामुळे गोविपाने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचे ठरवले होते. परंतु तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांशी बोलणी झाली व सरकारने आमचा पाठिंबा स्वीकारल्याचे सांगितले, त्यामुळे कुठ्ठाळीत पक्षाचा उमेदवार नसेल, अशी माहिती गोविपाचे सुप्रिमो आमदार मिकी पाशेको यांनी दिली. कुठ्ठाळी विधानसभा निवडणुकीत गोविपाचा उमेदवार दुसऱ्या स्थानावर होता, सुमारे साडेपाच हजार मतेही मिळाली होती याची आठवण त्यांनी करून दिली. सरकारला विनाअट पाठिंबा दिला असून, पाच वर्षे सरकारसोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. माध्यम प्रश्‍न, दाबोळी विमानतळ, प्रादेशिक आराखड्याच्या मुद्यांवर मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर कुठ्ठाळी निवडणुकीत सरकारबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

सरकार मजबूत : मगो
दरम्यान सरकारातील युतीचा घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाचे अध्यक्ष सहकारमंत्री पांडुरंग ऊर्फ दीपक ढवळीकर यांनी गोविपाच्या पाठिंब्यामुळे सरकार मजबूत होईल, विकासकामे अडथळ्याविना करता येतील, असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

सरकारचे संख्याबळ
  • भाजप 20
  • म.गो. 3
  • अपक्ष 2
  • गोविपा 2



 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: