जीसीए निवडणुकीवरून वाद; प्रक्रिया सुरू ठेवल्याने पोलिसांत तक्रार
(क्रीडा प्रतिनिधी)
Thursday, May 17, 2012 AT 03:15 AM (IST)
पणजी, ता. 16 - गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) नवे अध्यक्ष म्हणून विनोद फडके यांनी ताबा घेतला, परंतु याबाबतचा वाद काही शमण्याची चिन्हे नाहीत. आता निवडणूक प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. निवडणूक पुढे ढकलण्याचा व्यवस्थापकीय समितीचा निर्णय अव्हेरून कामकाज केल्याप्रकरणी जीसीएचे सचिव प्रसाद फातर्पेकर यांनी पर्वरी पोलिसांत बुधवारी तक्रार नोंदवली.
ऍड. दयानंद नार्वेकर यांना अध्यक्षपदावरून विद्यमान व्यवस्थापकीय समितीने बडतर्फ केल्यानंतर, नवे अध्यक्ष विनोद फडके यांनी 27 मे रोजी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले होते. हा निर्णय व्यवस्थापकीय समितीच्या सोमवारच्या (14) बैठकीत एकमताने झाला होता. मात्र ऍड. दिलीप दाबोळकर यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय निवडणूक समितीने संबंधित प्रक्रिया बुधवारी सुरू ठेवली. दिवसभरात एकूण 18 अर्जही दाखल झाले. या घडामोडीची जीसीएने गंभीर दखल घेतली. संध्याकाळी प्रसाद फातर्पेकर यांनी यासंबंधी पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. "14 मे रोजी झालेल्या व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत 27 मे रोजीची बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय झालेला आहे. त्या निर्णयाचा आदर करून संबंधित निवडणूक समितीने कार्य थांबवावे, अन्यथा गोवा क्रिकेट असोसिएशनला कडक कारवाई करणे भाग पडेल,'' असा इशारा फातर्पेकर यांनी नंतर दिला. आज संध्याकाळी 5.30 नंतर ऍड. दाबोळकर यांचा दूरध्वनी बंद होता, त्यामुळे त्यांची प्रक्रिया समजू शकली नाही.
जाहिरातीमुळे गोंधळ
गेल्या 5 मे रोजी ऍड. दाबोळकर यांनी 2012-2015 या कालावधीसाठी जीसीए व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीच्या सविस्तर कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानंतर 10 मे रोजी 15 पैकी 11 सदस्यांनी पत्रक फिरवून नार्वेकर यांना बडतर्फ करण्याचा ठराव घेतला व रविवारी जीसीएचा पोलिस संरक्षणात ताबाही घेतला होता. जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीतून, तसेच प्राथमिक सदस्य म्हणून बडतर्फ करण्याचा निर्णय 11 सदस्यांनी एकमताने घेताना जीसीएच्या संलग्न क्लबांच्या तक्रारीवरून निवडणूकही पुढे ढकलण्याचा निर्णय व्यवस्थापकीय समितीने घेतला होता. मात्र निवडणूक समितीचे अध्यक्ष ऍड. दाबोळकर यांनी बुधवारी वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन निवडणूक प्रक्रिया सुरूच असल्याचे जाहीर केले होते. जीसीएच्या पर्वरी येथील प्रशासकीय कार्यालयात जागा नसल्यामुळे संबंधित काम पर्वरी येथीलच क्षात्रतेज सभागृहात सुरू करत असल्याचे जाहीर करून त्यांनी बुधवारी उमेदवारी अर्जही स्वीकारले होते. ऍड. शिरीन नाईक व मॅक्स फुर्तादो हे या समितीचे अन्य सदस्य आहेत. अगोदरच्या निवडणूक कार्यक्रमानुसार गुरुवारपर्यंत (ता. 17) अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
आणखी दोघे नार्वेकरांपासून दूर
जीसीएच्या अगोदरच्या व्यवस्थापकीय समितीतील उपाध्यक्ष प्रकाश फडते व श्रीकृष्ण तारी यांनी बुधवारी ऍड. नार्वेकर यांची साथ सोडली. त्यामुळे 15 सदस्यीय व्यवस्थापकीय समितीत नार्वेकर यांच्याविरोधात 13 सदस्य झाले आहेत. अन्य एक सदस्य दया पागी यांनी अजून आपली भूमिका जाहीर केलेली नाही. 14 रोजी फडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऍड. नार्वेकर यांना बडतर्फ करण्यात आले होते, त्यावेळी फडते, तारी व पागी अनुपस्थितीत राहिले होते. आज फडते व तारी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे नार्वेकर यांना बडतर्फ करण्याच्या ठरावाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. गेल्या 11 मे रोजी नार्वेकर यांनी तारी यांना जीसीएचे सचिव म्हणून नियुक्त केल्याचे जाहीर केले होते.
चौकशी समिती समाधानी
जीसीएतील कथित गैरकारभाराविषयी चौकशी करणाऱ्या द्विसदस्यीय चौकशी समितीला नव्या व्यवस्थापकीय समितीकडून चांगले सहकार्य मिळत आहे व आपण समाधानी आहे, असे या समितीचे प्रमुख चेतन देसाई यांनी सांगितले. जीसीएचे 1 एप्रिल 2011 पासूनचे इतिवृत्त व बॅंक पासबुक लेखापालांकडे असल्यामुळे ते मिळालेले नाही, उद्यापर्यंत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जीसीएने दिले आहे, असे देसाई यांनी नमूद केले.
"जीसीए'वर प्रशासक?
जीसीएची आगामी निवडणूक निष्पक्षपणे, तसेच मुक्तपणे व्हावी यासाठी संघटनेवर प्रशासक नेमावा अशी मागणी होत आहे. राज्यातील व्हेटरन क्रिकेटपटूंनी या संदर्भात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्रही लिहिलेले आहे. एकंदरीत वातावरणाचा अंदाज घेऊन प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात निर्णय पुढील आठवड्यात होऊ शकतो, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.