भात बियाण्यांच्या 34 जाती नामशेष
-
Monday, May 28, 2012 AT 11:31 PM (IST)
| अवित बगळे पणजी, ता. 28 ः काळाच्या ओघात आहारशैली बदलते. तसे काही अन्नपदार्थही काळाच्या पडद्याआड जातात. गोमंतकीय भातशेतीत एवढे बदल झाले, की भात बियाण्यांच्या 34 जातीच काळ्याच्या उदरात गडप झाल्या आहेत. दुसरे म्हणजे कृषी खाते वा कृषी संशोधन परिषदेकडेही हे भात बियाणे आता नाही. केवळ आता इतिहासात एवढ्या भाताच्या जाती गोव्यात होत्या, अशीच नोंद राहणार आहे. एकेकाळी गोवा हे "भाताचे कोठार' मानले जात असे. देशात दुष्काळ पडला तेव्हाही गोव्यात पुरेसे अन्न होते, अशी नोंद आहे. त्याशिवाय सासष्टी आणि बार्देश हे तालुके भात उत्पादनासाठी पोर्तुगीजकाळातही प्रसिद्ध होते. अशा या राज्याने आता भात बियाण्यांच्या 34 जाती कायमच्या गमावल्याचे सत्य चार वर्षांच्या संशोधनानंतर पुढे आले आहे. गोवा विद्यापीठात पी.एचडी.साठी संशोधन करणाऱ्या शिवोलीतील शिल्पा भोसले या विद्यार्थिनीने ही माहिती संकलित केली आहे. त्याची नोंद तिने व तिचे मार्गदर्शक एस. कृष्णन यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या "गोव्याचा तांदूळ आणि त्याचा दर्जा' या पुस्तकात केली आहे. 5 जून या जागतिक पर्यावरणदिनी गोवा विद्यापीठात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. शिल्पा हिने विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी घेताना 2008 मध्ये गोव्यातील भातशेतीवर एक प्रकल्प केला होता. त्यावेळीच तिला भातशेतीत झालेले बदल जाणवले होते. तोच विषय व्यापक रितीने पी.एचडी.साठी निवडताना तिने माहिती संकलनास सुरवात केली. मूळ प्रबंध आकाराला आल्यानंतर राहिलेल्या माहितीचे काय करायचे, हाही प्रश्न होता. चार वर्षे पूर्ण राज्यभरात भटकून जमा केलेली माहिती वायाही जावू द्यायची नव्हती. अखेर पुस्तकरूपाने मांडण्याची कल्पना डोक्यात आली नि ती मूर्त स्वरूपातही आकाराला आली आहे. गोमंतकीय तांदळाचा पूर्ण इतिहास-भूगोल उलगडवणारे असे हे पुस्तक आहे. आजही राज्यात 28 प्रकारचे स्थानिक भात बियाणे वापरात आहे तर 22 प्रकारचे संकरित भात बियाणे वापरात आहे, अशी माहितीही तिच्या या पुस्तकात आहे. अमुक एक प्रकारचा तांदूळ दिसण्यास कसा दिसतो, त्याचा आकार काय, त्याची लांबी काय इथपासून त्याच्यात प्रथिने कोणती आहेत, तो किती वेळात शिजतो, शिजविल्यानंतर त्याचा सुगंध कोणता आणि त्या तांदळाचा वापर कोणते जिन्नस तयार करायला होतो याची माहितीही शिल्पाने या पुस्तकात दिली आहे. तांदळाचा वापर ओटी भरण्यासाठी, लग्नात अक्षतांसाठी करतात असा उल्लेखही पुस्तकात असल्याचे शिल्पाने सांगितले. --------------- जीवनशैलीचे नमुने अभ्यासण्यास मिळणार "भात' या विषयावर असे सखोल लेखन कोणी न केल्याने या विषयाकडे वळल्याचे शिल्पा हिने सांगितले. ती म्हणाली, भात कांडण्याची पारंपरिक पद्धत आज नाही, पण तिचाही उल्लेख मी केला आहे. भात ठेवण्याच्याही वेगळ्या पद्धती पूर्वी होत्या. आमच्या जीवनशैलीचे हे नमुने नव्या पिढीला अभ्यासण्यासाठी आता मिळणार नाहीत. पूर्वी काय ठेवा होता याची माहिती म्हणूनच पुस्तकरूपाने आणण्याचा निर्णय घेतला. ----------- नष्ट झालेल्या भात बियाण्याच्या जाती बाबरी, बेड्डो, भगरकड्डी, भांगरसाळ, चागर, चुडी, धाकलो केंदाल, धवी पत्री, धवो केंदाल, धवो पांड्यो, दोडगाचे, डोंगरी, जर्मल, केनाल, कुकुंमसाल, कुराद पाटणी, मांडला, मिडल केंदाल, मोरे पाटणी, मोरोड केंडाल, मोरोड पांड्यो, मुगाडो, मुटाळगो, नेमार, ओडूस्को, पांड्यो, रुंगा, साळशी, सांबारसाळ, शिरीबिडी, सोट्टी, तांबडी पाटणी, तांबडो पांड्यो, व्होडलो केंदाल आणि झिट्टो. ------------
सध्या वापरात असलेले बियाणे आसगो, बारीक कुडी, बेळो, दामगो, धवे, एक काडी, घन्साळ, जिरगा, जिरेसाळ, काळो दामगो, काळो कोरगुट, काळो मुणगो, कर्ज, केंदाल, खोचरो, कोलयो, कोरगुट, कोटीमिरसाळ, कुसागो, मुणो, नोवान, साळ, शियेडी, तामडी, तास्यू आणि वालय.
|
|