बेळगावः डॉल्बी बंद करण्याबरोबरच विसर्जनावरून तणाव

बेळगावः डॉल्बी बंद करण्याबरोबरच विसर्जनावरून तणाव

बेळगावः डॉल्बी बंद करण्यास सांगून लॅपटॉप काढून घेतल्याने शिवाजी उद्यानाजवळ तणाव निर्माण झाला. याशिवाय शेवटी कोणत्या मंडळाच्या श्रीचे विसर्जन यावरूनही कपीलेश्‍वर तलावाजवळ वाद सुरू राहिला. महात्मा फुले रोड व अनगोळमध्ये किरकोळ तणाव निर्माण झाला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अनगोळ येथे रघुनाथ पेठ व राजहंस गल्लीतील दोन्ही मंडळाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येऊन त्यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला. पोलिसांनी किरकोळ लाठीहल्ला करून दोघांना ताब्यात घेतले. महात्मा फुले रोडवरही किरकोळ वाद झाला. परंतु, तो देखील लगेच शमला. त्यामुळे रात्रीपासून आज सकाळपर्यंत मिरवणूक शांततेत सुरू होती. परंतु, सकाळी 9 पर्यंतची वेळ असताना 11 वाजेपर्यंत डॉल्बी लावली जात आहे, असे म्हणत पोलिसांनी मंडळांना भरभर पुढे सरकण्यास सांगितले. संभाजी रोड खासबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक शिवाजी उद्यानाजवळ आली तेव्हा दुपारीचे साडेबारा वाजला होते. पोलिसांनी डॉल्बी बंद करा असे सांगत लॅपटॉप काढून घेतला. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी येथेच ठिय्या धरला. जोपर्यंत लॅपटॉप मिळत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे पोलिसांनी येथे काही तरुणांना लाठीने मारहाण केली. सुमारे पाऊण तास पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू होता. यानंतर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व पोलिसांनी तोडगा काढत पुन्हा मिरवणूक सुरू केली.

अखेर विसर्जन कोणाचे?
दुपारी 2 वाजल्यानंतर कोणाच्या मंडळाच्या श्रींचे अखेरीस विसर्जन यावरून तीन मंडळे अडून बसली. यामध्ये अनगोळमधील दोन तर खडक गल्लीचे मंडळ होते. आमच्याच मंडळाचे अखेर विसर्जन असे म्हणत तिन्ही मंडळे थांबून राहिल्याने पोलिसांनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघा तरुणांना किरकोळ दुखापत झाली. महापौर संज्योत बांदेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, माया कडोलकर, पंढरी परब, मोहन भांदुर्गे, महेश नाईक, सरिता पाटील, श्रीराम सेनेचे रमाकांत कोंडुसकर, पालिका आयुक्त शशिधर कुरेर, डीसीपी अमरनाथ रेड्डी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. दुपारचे तीन वाजून गेले तरी श्रीमूर्तींचे विसर्जन झालेले नव्हते. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून तिन्ही श्रींचे एकाचवेळी विसर्जन करण्याचा पर्याय पुढे आला. परंतु, तिन्ही मंडळाचे कार्यकर्ते ते मान्य करायला तयार नव्हते. त्यामुळे कपीलेश्‍वर तलावाच्या बाजूला मूर्ती थांबवून ठेवल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com