''देशात मजबूत न्यायव्यवस्था असताना असहिष्णूता निर्माण होणे शक्य नाही''  

E Sreedharan
E Sreedharan

मेट्रो मॅन म्हणून ओळखले जाणारे ई श्रीधरन हे लवकरच भारतीय जनता पक्षात सामील होणार आहेत. केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी 21 फेब्रुवारी रोजी कासारगोड येथे होणाऱ्या भाजपच्या विजय यात्रेवेळी ई श्रीधरन हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी केरळ राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्यासाठीच आपण राजकारणात उतरत असल्याचे ई श्रीधरन यांनी म्हटले आहे. तसेच राजकारणात प्रवेश करून राज्याच्या हिताचे काम करणार असल्याचे त्यांनी आज म्हटले आहे. यानंतर केरळ मध्ये भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपद देखील सांभाळण्यास तयार असल्याचे मोठे वक्तव्य ई श्रीधरन यांनी केले आहे. 

ई श्रीधरन यांनी आज आपल्या आगामी राजकीय प्रवेशाबाबत बोलताना, भाजपची सत्ता केरळ मध्ये आल्यास राज्याला कर्जमुक्त करणार असल्याचे सांगितले. याशिवाय राज्यात पायाभूत सोयीसुविधा उभारणार असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर, राज्यपाल पद सांभाळण्यात कोणताही रस नसल्याचे ई श्रीधरन यांनी म्हणत, कोणतेही 'घटनात्मक' पद असताना राज्यासाठी योगदान देता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच असहिष्णूतेच्या बाबत भाष्य करताना, देशात असहिष्णूता कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. असहिष्णूतेच्या फक्त निव्वळ चर्चा असल्याचे ई श्रीधरन म्हटले असून, देशात सर्वात मजबूत अशी न्यायव्यवस्था आहे. आणि त्यामुळे देशात असहिष्णूता निर्माण होणे शक्य नसल्याचे त्यांनी पुढे अधोरेखित केले आहे. व विरोधकांचे सरकारने मान्य न केल्यास ते देशात असहिष्णूता असल्याचा आरोप करत असल्याची टीका ई श्रीधरन यांनी यावेळी केली आहे. इतकेच नाही तर, देशात कोठेही असहिष्णूता नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

त्यानंतर दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना, केंद्र सरकारने केलेले नवीन कृषी विधेयक हे शेतकऱ्यांना समजले नसल्याचे ई श्रीधरन यांनी म्हटले आहे. एकतर नवीन कृषी सुधारणा शेतकऱ्यांना समजलेल्या नाहीत किंवा कोणत्यातरी राजकीय कारणामुळे शेतकऱ्यांना या सुधारणा समजून घ्यायच्या नसल्याचे ई श्रीधरन यांनी म्हटले आहे. त्यानंतर केंद्र सरकार जे काही करते त्याला विरोध करणे ही देशात फॅशन बनल्याची टिप्पणी ई श्रीधरन यांनी केली. याव्यतिरिक्त, केंद्र सरकारने जे काही करायचे ठरवले आहे त्याला दुर्देवाने विरोध करण्यात येत असल्याचे मत ई श्रीधरन यांनी आज व्यक्त केले आहे. 

दरम्यान, केरळ मधील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांच्या नेतृत्वाखाली पक्ष 21 फेब्रुवारीपासून विजय यात्रा काढणार आहे. आणि या यात्रेच्या वेळेस मेट्रो मॅन ई श्रीधरन हे भाजपामध्ये सामील होणार आहेत. ई श्रीधरन यांना देशात मेट्रो रेल्वेमध्ये केलेल्या महत्वपूर्ण कामामुळे मेट्रो मॅन म्हणून पाहिले जाते. दिल्ली मेट्रोच्या जवळपास प्रत्येक टप्प्याचे काम ई श्रीधरन यांनी वेळेच्या आधी पूर्ण केले होते. आणि मेट्रोसारख्या परिवहन माध्यमातील त्यांच्या या योगदानामुळे 2001 मध्ये पद्मश्री आणि 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने ई श्रीधरन यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे ई श्रीधरन आता राजकारणात उतरणार असल्यामुळे त्यांच्याकडून वेगळे काहीतरी करून दाखवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.                 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com