गिरीराज सिंह व स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर केला इटालियन भाषेत हल्लाबोल  

Giriraj Singh and Smriti Irani criticism on Rahul Gandhi in Italian
Giriraj Singh and Smriti Irani criticism on Rahul Gandhi in Italian

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुद्दुचेरी मधील सभेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह व स्मृती इराणी यांनी सोशल मीडियाच्या ट्विटरवरून राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. गिरीराज सिंह व स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्या मश्चिमारांसाठी स्वतंत्र्य मंत्रालय स्थापण्याच्या मागणीवर बोलताना, काँग्रेस पक्ष हा अज्ञानी आणि चुकीची माहिती पसरवत असल्याचे म्हटले आहे. तसेच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि स्मृती इराणी यांनी राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देताना आपले ट्विट इटालियन भाषेत लिहिले आहे. 

राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलन आणि त्यासंबधित केंद्र सरकारवर निशाणा साधताना, मश्चिमार हे समुद्रातील शेतकरी असल्याचे म्हणत त्यांच्यासाठी स्वतंत्र्य मंत्रालय स्थापण्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्या टीकेवर इटालियन भाषेत ट्विट करत तोफ डागली आहे. या ट्विटमध्ये गिरीराज सिंह यांनी, इटली मध्ये देखील मत्स्यव्यवसाय संदर्भात स्वतंत्र्य मंत्रालय नसल्याचा टोमणा राहुल गांधी यांना लगावला आहे. याशिवाय इटलीत देखील मत्स्यव्यवसायासंबंधित विभाग हा कृषी व वनीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत असल्याचे त्यांनी पुढे लिहिले आहे.  

याशिवाय गिरीराज सिंह यांनी अजून एक ट्विट हिंदीत केले असून, त्यात त्यांनी राहुल गांधींना उद्देशून, '' राहुल जी! तुम्हाला माहित असायला हवे की, 31 मे  2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे मंत्रालय उभारले आहे. आणि तसेच 20050 कोटी रुपयांचा मास्टर प्लॅन आखला आहे. व तो स्वातंत्र्यापासून ते 2014 पर्यंतचा अनेक पटीने जास्त आहे.'' याव्यतिरिक्त, नवीन मत्स्यव्यवसाय मंत्रालयात राहुल गांधींना येण्याची विनंती गिरीराज सिंह यांनी  पुढे केलेली आहे. व या मंत्रालयाअंतर्गत देशभरातील योजना आपण सांगण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.    

गिरीराज सिंह यांच्यानंतर केंद्रीय वस्त्रउद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी देखील राहुल गांधी यांच्या पुद्दुचेरी येथे करण्यात आलेल्या टीकेवर जोरदार हल्ला चढवला आहे. स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना उत्तर देताना, काँग्रेसचे नेते आणि स्वतः राहुल गांधी हे खोटे, भीती आणि चुकीची माहिती पसरवत असल्याचे म्हटले आहे. आणि विशेष म्हणजे स्मृती इराणी यांनी देखील आपले हे ट्विट इटालियन भाषेत लिहिले आहे.

दरम्यान, राहुल गांधी आज पुद्दुचेरीला भेट दिली. व यावेळेस त्यांनी मच्छीमारांची भेट घेत केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याचा उल्लेख करत जोरदार टीका केली. तसेच आपण मच्छिमारांना समुद्राचे शेतकरी मानत असल्याचे नमूद केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी मच्छिमारांसाठी स्वतंत्र केंद्रीय मंत्रालयाची गरज व्यक्त केली. मच्छीमारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "सरकारने शेतकऱ्यांविरोधात तीन कायदे केले आहेत, शेतकरी या देशाचा आधार आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी मच्छीमारांच्या सभेत शेतकऱ्यांविषयी का बोलत आहे? मी तुम्हा लोकांना समुद्राचे शेतकरी मानतो, जर जमीनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे दिल्लीत मंत्रालय असू शकते तर समुद्राच्या शेतकऱ्यांचे का नाही होवू शकत?" 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com