कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून पलायन करणारे कैदी पुन्हा ताब्यात

Prisoners who escaped from Kolwal Central Jail were recaptured yesterday
Prisoners who escaped from Kolwal Central Jail were recaptured yesterday

पणजी: काल संध्याकाळी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून पलायन केल्याचा संशय असलेले दोघे कच्चे कैदी उपेंद्र नाईक व हुसेन कोयडे या दोघांना काल मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. हे दोघेही कारागृहातील जुन्या कार्यालयात रात्रभर लपून बसले होते. रात्री साडेतीनच्या सुमारास त्यांनी कारागृहाचा संरक्षक भिंतीवरून पलायन करण्याचा प्रयत्न करीत असताना कारागृहात असलेल्या टॉवरवरील  पोलीस सुरक्षारक्षकाने त्यांना पाहिले व त्यानंतर तुरूंग रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले. एकाने संरक्षक भिंतीवरून उडी घेण्याचा प्रयत्न केला असता तो खाली पडला व तो जखमी झाला आहे. पलायन केलेल्या कैद्यांची नावे हुसेन कोयडे व उपेंद्र नाईक अशी आहेत. काल रात्री सुद्धा या कच्च्या कैद्यांची शोधमोहीम सुरू होती त्यामध्ये पोलिस व अंगरक्षकांना यश आले आहे. 

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून काल संध्याकाळी दोन कच्‍च्या कैद्यांनी पलायन केल्याने खळबळ माजली होती. कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी व तुरुंगरक्षकांनी त्यांचा आजुबाजूला शोधमोहीम सुरू केली असून अजूनही ते सापडले नव्हते. या दोन्ही कच्च्या कैद्यांविरुद्ध अनुक्रमे बलात्कार व खुनाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल होऊन खटला सुरू आहे. वारंवार कैद्यांच्या पलायनाच्या घटनांमुळे कारागृहाच्या अधिकाऱ्यांसमोर आव्हान उभे राहिले आहे.  
तुरुंगरक्षक संशयाच्‍या घेऱ्यात...
या मध्यवर्ती कारागृहातून कैद्यांच्या पलायनाचे सत्र सुरूच आहे. त्यामध्ये काही तुरुंगरक्षक गुंतल्याचा संशय असल्याने या प्रकरणाची क्राईम ब्रँचमार्फत चौकशी सुरू होती.  कैद्यांच्या पलायनानंतर क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना तसेच म्हापशाचे उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी काल संध्याकाळी उशिरा पोलिस फौजफाटा तसेच तुरुंगरक्षकासह कारागृहातील कानाकोपरा पिंजून काढला होता.

पाण्‍याच्‍या टँकरमधून पलायन?
कारागृहात आज संध्याकाळी पाण्याचा टँकर आला होता, त्यावेळी त्यातून ते पसार झाले असण्याचा तर्कवितर्क करण्यात येत आहे. पाण्याचा टँकर निघून गेल्यापासून ते कारागृहातील आवारात दिसले नव्हते. संध्याकाळी त्यांना कारागृहातील खोल्यांमध्ये नेताना हे दोन्ही कैदी दिसले नाहीत तेव्हा त्यांची शोधाशोध सुरू झाली. मात्र, कुठेच सापडले नाहीत. या कैद्यांना नेहमीप्रमाणे संध्याकाळी मोकळ्या हवेसाठी कारागृहाच्या आतील आवारातच सोडण्यात आले होेते.

वारंवार घटना का घडतात?

मध्यवर्ती कारागृहातून कैदी पलायनाच्या वारंवार घटना सुरूच असल्याने हे कारागृह असुरक्षित बनले आहे. येथील सुरक्षा यंत्रणाच खिळखिळी बनली आहे किंवा या कारागृहातील अधिकारी व कर्मचारी कैद्यांना पलायनास मदत करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले. यापूर्वी एका कैद्याने पलायन केल्यावर तेथील पोलिस सुरक्षा कर्मचारी बदलण्यात आले होते. मात्र, हे प्रकार अजूनही थांबत नसल्याने यामागे कटकारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा लोकांमध्‍ये सुरू झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com