कोपर्डी प्रकरणाची अंतिम सुनावणी 10 ऑक्‍टोबरपासून 

कोपर्डी प्रकरणाची अंतिम सुनावणी 10 ऑक्‍टोबरपासून 

नगर : कोपर्डी अत्याचार आणि खून खटल्यातील सर्व साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे येत्या 10 ऑक्‍टोबरपासून खटल्याच्या अंतिम सुनावणीस सुरवात होणार आहे. 

न्यायालयामध्ये 'सीडी' सादर करणारे 'यशदा'चे माजी अधिकारी रवींद्र चव्हाण यांची सरकार पक्षातर्फे आज उलटतपासणी पूर्ण झाली. उलटतपासणीमध्ये विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी चव्हाण यांच्यावर तीन तास प्रश्‍नांची सरबत्ती केली. न्यायालयात सादर केलेल्या 'सीडी' बनावट असल्याचा आरोप ऍड. निकम यांनी केला. 

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर सुरू आहे. या खटल्यात चव्हाण यांची साक्ष नोंदविण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आरोपीला परवानगी दिली होती. आरोपी संतोष भवाळपर्फे ऍड. बाळासाहेब खोपडे यांनी सरतपासणी आणि ऍड. निकम यांनी उलटतपासणी घेतली. मागील सुनावणीदरम्यान राहिलेली उलटतपासणी आज पूर्ण झाली. 

'न्यायालयात दाखल केलेल्या सीडीमधील व्हिडिओ बनावट आणि त्यात फेरफार केलेले आहेत. वापरात असलेले मोबाईल कंपनीचे आहेत. खटल्याबाबतची प्रत्येक बाब काळजीपूर्वक पाहिली जात होती. मुंबईतील पावसात गुंतल्याचे सांगत एका तारखेला गैरहजर राहिलात; पण मुंबईला गेलाच नाहीत. मुंबईला गेल्याचा कोणताही पुरावा सादर करू शकत नाही. तुमच्या वतीने भगवान जगताप यांनी अर्ज दाखल केला; पण तुम्ही त्यांना खोटी माहिती दिली. विधान परिषदेतील भाषणाच्या सीडी न्यायालयात देण्याआधी विधान परिषदेच्या सभापतींची परवानगी घेतली होती का, हा हक्कभंग आहे', असे सांगत 'खोटी साक्ष देत आहात' असा आरोप ऍड. निकम यांनी केला. 

खटल्यातील सर्व साक्ष व उलटतपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे 10 ऑक्‍टोबरपासून अंतिम सुनावणीस सुरवात होणार आहे. दरम्यान, मुंबईत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाला दिलेल्या परवानगीबाबत विचारणा करण्यासाठी आरोपी नितीन भैलुमेचे वकील ऍड. आहेर यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर 26 सप्टेंबर रोजी सुनावणी होईल. 

न्यायालयात दाखवले सीडीतील व्हिडिओ 
कोपर्डी घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेले निवेदन, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची एका वृत्तवाहिनीवरील मुलाखत, ऍड. निकम आणि भैय्यू महाराज यांची खासगी भेट यावर चव्हाण यांनी आक्षेप घेतला होता. ते व्हिडिओ आज न्यायालयात दाखविण्यात आले. यावेळी निकम म्हणाले, "मुख्यमंत्र्यांना कोणतेही प्रश्‍न विचारल्याचे व्हिडिओत दिसत नाही. कोणत्या आमदारांनी विचारले, हे तुम्हाला माहीत नाही. माझी आणि भैय्यू महाराज यांची भेट झाली; पण त्यात कोपर्डीसंदर्भात काहीही बाब आली नाही.'' 

माझ्याबद्दल वैयक्तिक आकस 
चव्हाण यांची उलटतपासणी घेताना माझ्याबद्दल तुम्हाला वैयक्तिक आकस असल्याचा उल्लेख ऍड. निकम यांनी न्यायालयात केला. कोपर्डी खटल्याबाबत मी सरकारकडून किती शुल्क घेतले याची माहिती घेण्यासाठी माहिती अधिकारात अर्ज केला. मात्र त्या त्याशिवाय अन्य कोणताही माहिती विचारली नाही. खैरलांजी प्रकरणाचाही तुम्ही रिपोर्ट केला होता असे त्यांनी विचारले. चव्हाण यांनी मात्र वैयक्तिक आकस असल्याबाबत नकार दिला. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com