पश्चिम बगलमार्ग खांबांवरच:फ्रान्सिस सार्दिन.

highway-
highway-

सासष्टी:मडगाव पत्रकार परिषदेत बोलताना खासदार फ्रान्सिस सार्दिन.बाजूस ज्यो डायस व दीपक खरंगटे. 
पश्चिम बगलमार्गाचा स्थानिक तसेच शेतीला फटका बसणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून देण्यात आले असून सासष्टीवासीयांच्या भल्यासाठी हा रस्ता स्टिल्ट्स पुलाद्वारे (खांबांवरून) उभारण्यात यावा,अशी मागणी दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी आज मडगाव येथे पत्रकार परिषदेत केली. पश्चिम बगलमार्ग रस्त्यासंबंधी स्थानिकांना विश्वासात घेणे महत्वाचे होते, तर रस्ता पूर्ण झाल्यावर लोकांना रस्त्यावर उतरण्याची पाळी आणू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासमवेत झालेल्या बैठकीत पश्चिम बगलमार्ग रस्त्यासंबंधी स्थानिकांना भेडसावणाऱ्या समस्येवर चर्चा करण्यात आली असून हा रस्ता स्टिल्ट्स पुलाद्वारे उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. स्टिल्ट्स पुलाद्वारे रस्ता उभारण्यासाठी ४५० ते ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे, तर स्टिल्ट्सविना १३० कोटी खर्च येणार आहे. या बगलमार्गामुळे सासष्टीत पूरग्रस्त स्थिती निर्माण होणार असल्याने अनेक ठिकाणी साकव घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, पण साकवाचा फायदा स्थानिकांना होणार असून शेतीला तसेच स्थानिकांना याचा फटका बसणार आहे, असे खासदार सार्दिन यांनी सांगितले. स्टिल्ट्स पुलाद्वारे रस्ता उभारणे हा एकमेव पर्याय असल्यामुळे राज्य तसेच केंद्र सरकारने यावर लक्ष्य केंद्रीत करणे महत्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले. 
खाण व्यवसाय सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात येत आहे, पण आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. आर्थिक कणा मानला जाणारा खाण व्यवसाय बंद पडल्यामुळे गोव्याला आर्थिकरित्या बळकटी देण्याची जबाबदारी पर्यटन व्यवसायावर आलेली आहे. परंतु हल्लीच सनबर्नला अमली पदार्थाच्या अतिसेवनाने तीन पर्यटकांची झालेल्या मृत्यूमुळे पर्यटन व्यवसायावर संकट कोसळले आहे. पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री तसेच पर्यटन मंत्र्यांनी अमली पदार्थ विळख्यात पडलेल्या गोव्याला बाहेर काढण्यासाठी गोव्यात अमलीपदार्थाचा शिरकाव होण्यापासून बंद केले पाहिजे, अशी मागणी सार्दिन यांनी केली. अमलीपदार्थ येत राहिल्यास पर्यटक गोव्यात येणे बंद करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दक्षिण गोवा कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस आणि सचिव दीपक खंरगटे उपस्थित होते.

‘धर्माच्या मुद्यावरून राजकरण नको’
देशाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणारी घटना राखण्यासाठी अनेक काँग्रेस नेत्यांनी आपले बलिदान दिले असून केंद्र सरकारने धार्मिक सलोखा बिघडविणारे कायदे आणून अनेकांचे बलिदान वाया घालविण्यासाठी प्रयत्न केला आहे. सरकारने धर्माच्या मुद्यावरून राजकरण करणे बंद केले पाहिजे. जवाहरलाल विश्वविद्यालयात विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com