‘नंदु अपना’ने फुलवला भाजीचा मळा

dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

टाळेबंदीच्या काळात वळवई येथील नंदकुमार चंद्रकांत तारी या युवकाने एक आगळा वेगळा उपक्रम राबवून सामाजिक कार्य केले आहे. त्याने स्वकष्टाने भाजीचा मळा फुलविला व त्या भाजीचे उत्पादन मिळाल्यानंतर ही भाजी घरोघरी नागरिकांना मोफत वितरीत केली आहे. या त्याच्या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व थरातून त्याचे कौतुक होत आहे.

सावईवेरे

टाळेबंदीच्या काळात वळवई येथील नंदकुमार चंद्रकांत तारी या युवकाने एक आगळा वेगळा उपक्रम राबवून सामाजिक कार्य केले आहे. त्याने स्वकष्टाने भाजीचा मळा फुलविला व त्या भाजीचे उत्पादन मिळाल्यानंतर ही भाजी घरोघरी नागरिकांना मोफत वितरीत केली आहे. या त्याच्या समाजोपयोगी उपक्रमाचे सर्व थरातून त्याचे कौतुक होत आहे.
ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचे आपल्यावर अनंत उपकार असतात. मला समाजाने काय दिले याचा विचार न करता मी समाजासाठी कशाप्रकारे उपयोगी पडू शकतो अशी विचारधारणा असणाऱ्या व्यक्ती आज केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर करताच सामाजिक बांधिलकी ओळखून माणुसकीच्या दृष्टीकोनातून अनेक युवक, संस्था, क्लब यांनी गरजूंना मोफत जेवण, जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी मदतीचे हात दिले. अनेक राजकारण्यांनी तर लोकांना सहकार्य करून परमार्थाबरोबरच आपल्या स्वार्थाची पोळीही भाजून घेतली. मात्र, वळवई येथील नंदकुमार चंद्रकांत तारी या युवकाने एक वगेळ्या उपक्रमातून समाजपयोगी सेवा देण्याचा चंग बांधला. वळवई येथे अँथनी डायस यांच्या मालकीच्या जागेत नंदूने भाजीपाल्याची लागवड करून स्वकष्टाने भाजीचे पीक घेतले व वळवई भागातील लोकांना घरोघरी मोफत भाज्यांचे वितरण केले.
त्याच्या मळ्यात लाल भाजी, पालक, मुळा, भेंडी, चेटकी, वांगी, वाल या भाज्या फुलल्या आहेत. वळवई व सावईवेरे भागात
‘नंदू अपना’ या नावाने सुपरिचित असलेला हा नंदुकमार खरोखच सर्वांचा ‘आपला’ झाला. तो आपला उदरनिर्वाह रेती व्यवसायावरच चालवतो. वळवई भागात सध्या रेती व्यवहार ठप्प होऊनसुध्दा लोकांना मोफत भाजी देऊन त्याने समाजहिताचे भान ठेवले. फेब्रुवारी महिन्यात भाजीची लागवड करून कुणाचीही मदत न घेता वन मॅन शो करीत स्वकष्टाने नंदूने भाजीचा मळा फुलविला व कसलाही स्वार्थ न पाहता लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या मदतीसाठी हा युवक धावला हे विशेष.
नंदुशी संपर्क साधला असता त्याने सांगितले, की गेली सलग तीन वर्षे भाजीपाल्याची लागवड करून वळवई भागातील
गरजू लोकांनाच नव्हे तर इतर गावातील लोकांनासुध्दा मोफत भाज्या देत आहे. भाज्यांची लागवड करण्यासाठी अँथनी डायस यांनी मला मोफत जमीन दिल्याने त्यांचा मी ऋणी आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत २३ मार्चपासून ते आजपर्यंत सुमारे १०० घरांना मोफत भाज्या दिल्या आहेत. या उपक्रमातून समाजाची सेवा करण्याचा मला आनंद मिळतो व आनंदातून मला समाधान मिळते.
लॉकडाऊनच्या कालावधीत वळवई गावातील लोकांच्या खूपच उपयोगी पडल्यामुळे नंदुचे लोकांनी भरभरून कौतुक केले. नंदूचा हा आदर्श इतर युवकांनी घ्यावा असाच आहे.

संबंधित बातम्या