ऑनलाईन बुद्धिबळात खेळले १७ ग्रँडमास्टर

Dainik Gomantak
शनिवार, 18 एप्रिल 2020

तब्बल १७ ग्रँडमास्टर बुद्धिबळपटूंच्या सहभागाने चुरस वाढलेल्या गोव्यातील ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत पेरू देशाचा इंटरनॅशनल मास्टर टेरी रॅनॅटो याने विजेतेपद मिळविले. कोव्हिड-१९ महामारी मदतनिधीस हातभार लावणाऱ्या या स्पर्धेचे तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवन चेस ट्रिओ यांच्या सहकार्याने आयोजन केले होते.

पणजी,

लॉकडाऊन कालावधीत जगभरातील बुद्धिबळपटूंना सक्रिय करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात गोव्याचा एकमेव ग्रँडमास्टर अनुराग म्हामल, नीरज व नंदिनी ही सारिपल्ली भावंडे यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पेलली. स्पर्धा chess.com या संकेतस्थळावर झाली. तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सचिव अरविंद म्हामल यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेतील एकूण बक्षीस निधी संघटनेच्या व्यवस्थापकीय समिती पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या देणगीद्वारे जमविण्यात आला.

विजेत्या टेरी याने सर्वाधिक साडेआठ गुणांची कमाई केली. पेरू देशाचा ग्रँडमास्टर मार्टिनेझ अलकांत्रा जोस एदुआर्द याने ८ गुणांसह उपविजेतेपद मिळविले. भारताचा इंटरनॅशनल मास्टर रवी तेजा याचेही ८ गुण झाले, त्याला तिसरा क्रमांक मिळाला. पहिल्या ३० बक्षीसप्राप्त खेळाडूंत गोव्याचा फिडे मास्टर नीतिश याने १६वा क्रमांक मिळविला. गोमंतकीय खेळाडूंत ऋत्विज परब, लिऑन मेंडोसा, अनिरुद्ध पार्सेकर, मंदार लाड, अन्वेश बांदेकर यांनी पहिले पाच क्रमांक मिळविले. जॉय काकोडकर (तिसवाडीत उत्कृष्ट), अर्विन आल्बुकर्क (८ वर्षांखालील), एथन वाझ व अथर्व सावळ (१० वर्षांखालील), एड्रिक वाझ (१२ वर्षांखालील) यांनाही बक्षिसे मिळाली.

संबंधित बातम्या