दोन मच्छिमारी बोटमालकांना प्रत्येकी २.४५ लाखांचा दंड

dainik gomantak
बुधवार, 22 एप्रिल 2020

दोन मच्छिमारी बोटमालकांना  प्रत्येकी २.४५ लाखांचा दंड 

पणजी,

राज्यात लॉकडाऊन व सीमा सील करण्यात आलेल्या असताना गोव्याच्या दोन मच्छिमारी बोटींतून पाच
राज्याबाहेरील खलाशांना गोव्यात आणल्याप्रकरणी मच्छिमारी खात्याने ‘सुकणे’ व ‘सुकनेम २’ या बोटीच्या मालकांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी २.४५ लाख रुपयांचा दंड दोन दिवसात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर गोव्याच्या सीमा राज्याबाहेरील लोकांना येण्यास बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, या बोटीवरील खलाशांनी कारवारमधील (कर्नाटक) पाचजणांना गोव्यात आणल्याने बोटमालक ज्युलियस मायकल रॉड्रिग्ज (वार्का) व पिओ टोनी रॉड्रिग्ज (वार्का) या दोघांना दिलेल्या कारणदाखवा नोटिशीला लेखी उत्तर २४ तासात देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना दिलेल्या वेळेत उत्तर न दिल्यास त्यांच्या बोटींचा मच्छिमारी व्यवसायाचा परवाना कोणतीही पुढील नोटीस न देता रद्द करण्यात येईल असनोटिशीत स्पष्ट केले आहे.
कुटबण येथील मच्छिमारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुकने व सुकनेम या दोन्ही मच्छिमारी बोटीतून कारवार येथील अनुक्रमे तीन व दोन खलाशांना आणण्यात आल्याची माहिती खात्याला दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत या खलाशांची आरोग्य तपासणी करून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या बोटीवर काम करणाऱ्या इतर खलाशांनाही सावधगिरी म्हणू क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. या दोन्ही बोटी १४ एप्रिलला खोल समुद्रात मच्छिमारीसाठी गेल्या होत्या व २० एप्रलिला परल्या होत्या. सातपैकी तीन खलाशी सुकने बोटीवर तर दोन सुकनेम - २ या बोटीवरून गोव्यात आले होते. या बोटींना कोणत्याच मच्छिमारी धक्क्यावर नांगरून ठेवू नये असे मच्छिमारी खात्याने सूचित केले आहे.

संबंधित बातम्या