हरमलायेथे ७१ लाखांचा ड्रग्ज जप्त  

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

टर्कीचा माजी लष्कर कमांडोला अटक, ‘एएनसी’ची कारवाई

पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, संशयित मुरात तास हा पूर्वी टर्की लष्कर कमांडो होता. त्यानंतर तो बेरोजगार झाल्यावर ड्रग्ज विक्रीचा व्यवसाय सुरू केला. नोव्हेंबर २०१९ मध्ये भारतात तो दुसऱ्यांदा आला आहे.

पणजी : टर्की देशातील माजी लष्कर कमांडो असलेल्या मुरात तास (४७) याला अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) आज पहाटे हरमल येथे अटक करून त्याच्याकडून सुमारे ७१ लाखांचा ‘एमडीएमए’ प्रकारचा ड्रग्ज केला. विदेशी नागरिक त्याचे ग्राहक होते. न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे, अशी माहिती कक्षाचे पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली.

संशयित मुरात तास हा हरमल येथील भाडेपट्टीच्या घरात राहत असून तो विदेशी ग्राहकांना ड्रग्ज विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी आज पहाटे तो राहत असलेल्या खोलीवर छापा टाकला. खोलीची झडती घेतली असता ७१० ग्रॅम ‘एमडीएमए’ ड्रग्ज सापडला. त्याने हा ड्रग्ज गोव्यातील पर्यटकांसाठी विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अरुण देसाई हे करीत आहेत.

यापूर्वी तो भारतात आला तेव्हा गोव्यातच राहिला होता. विदेशी नागरिकांना तो ड्रग्ज खरेदीसाठी लक्ष्य करत होता. गोव्यातील रात्रीच्या मद्य पार्ट्यांना जात होता व तेथे तो विदेशी नागरिकांची मैत्री करून त्यांना ड्रग्ज पुरवठा करत होता. तो ड्रग्ज माफिया असून तो किरकोळ ड्रग्ज विक्रेत्यांनी विक्री करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचे शिक्षण शालान्‍त परीक्षेपर्यंत झाले असून ऐशआरामात जीवन घालवण्याचा त्याचा छंद आहे.

अमलीपदार्थविरोधी कक्षाचे निरीक्षक सुदेश वेळीप व सितांकात नायक यांनी पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. कारवाईमध्ये उपनिरीक्षक प्रितेश मडगावकर, उपनिरीक्षक रोहन मडगावकर, उपनिरीक्षक अरुण देसाई, कॉन्स्टेबल संदेश वळवईकर, सुशांत पागी, निकेत नाईक, मंदार नाईक, नितेश मुळगावकर, धीरेंद्र सावंत, रुपेश कांदोळकर, विष्णू हरमलकर, प्रसाद तेली, चंद्रू निगळूर व महिला कॉन्स्टेबल वेलसिया फर्नांडिस यांचा समावेश होता.

 

संबंधित बातम्या