५० जागांसाठी २०३ उमेदवार रिंगणात

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

पणजीः उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी २२ मार्च रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज अर्ज मागे घेतल्यानंतर २०३ उमेदवार रिंगणात राहिले. सांकवाळ मतदारसंघातून अनिता अजय थोरात या भाजपच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. उत्तर गोव्यातून १०४, तर दक्षिण गोव्यातून ९९ उमेदवार रिंगणात आहेत. चिंबल मतदारसंघात सर्वाधिक ८ उमेदवार रिंगणात आहेत.

पणजीः उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी २२ मार्च रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज अर्ज मागे घेतल्यानंतर २०३ उमेदवार रिंगणात राहिले. सांकवाळ मतदारसंघातून अनिता अजय थोरात या भाजपच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. उत्तर गोव्यातून १०४, तर दक्षिण गोव्यातून ९९ उमेदवार रिंगणात आहेत. चिंबल मतदारसंघात सर्वाधिक ८ उमेदवार रिंगणात आहेत.

सत्ताधारी भाजपने ४१ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यापैकी उत्तर गोव्यात २५, तर दक्षिण गोव्यात १६ उमेदवार आहेत. विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसने ३८ उमेदवार रिंगणात उतरवले असून उत्तर गोव्यात २१, तर दक्षिण गोव्यात १७ उमेदवार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उत्तर गोव्यात ३ व दक्षिण गोव्यात ३ मिळून ६ उमेदवार रिंगणात आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने १७ उमेदवार उभे केले असून त्यात उत्तर गोव्यात ७, तर दक्षिण गोव्यातील १० उमेदवारांचा समावेश आहे. आम आदमी पक्षाने २१ उमेदवार उभे केले आहेत. उत्तर गोव्यात ७, तर दक्षिण गोव्यात १४ उमेदवार आम आदमी पक्षाचे आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचा एकमेव उमेदवार मये मतदारसंघात आहे. उत्तर गोव्यात ४० व दक्षिण गोव्यात ३९ असे ७९ अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.

या निवडणुकीतील ५० मतदारसंघापैकी १९ सर्वसाधारण, तर ३१ आरक्षित मतदारसंघ आहेत. या आरक्षित मतदारसंघात १४ इतर मागासवर्गीय, ६ अनुसूचित जमाती व १ अनुसूचित जातीसाठी व १० महिलांसाठी आहे. महिलांसाठी एकूण १७ मतदारसंघ आरक्षित आहेत. निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून सुमारे साडेनऊ हजार कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ वापरण्यात येईल. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे सध्या सुरू आहे.

या निवडणुकीसाठी एकूण मतदार ८ लाख २९ हजार ८७६ आहेत. त्यामध्ये उत्तरेत पुरुष ४ लाख १८ हजार २२५, तर दक्षिणेत ४ लाख ११ हजार ६५१ मतदार आहेत. उत्तरेतील मतदारांमध्ये २ लाख ४ हजार २३० पुरुष, तर २ लाख १३ हजार ९९५ महिला मतदार आहेत. दक्षिणेतील मतदारांमध्ये २ लाख ४१ पुरुष, तर २ लाख ११ हजार ६१० महिला मतदार आहेत. दोन्ही जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. मतदारसंघातील मतदारांची सरासरी १६ हजार ६०० असली तर सर्वाधिक मतदार सांकवाळ मतदारसंघात (दक्षिण) व सुकूर (दक्षिण), तर सर्वाधिक कमी मतदार उसगाव गांजे (दक्षिण) व पाळी (उत्तर) मतदारसंघामध्ये आहेत. एकूण मतदान केंद्रे १२३७ असून त्यातील उत्तरेत ६४१, तर दक्षिणेत ५९६ केंद्रांचा समावेश आहे.

प्रत्येक उमेदवाराला पाच लाख रुपयांपर्यंत निवडणूक प्रचारासाठी खर्च करण्याची मर्यादा असून त्यामध्ये त्याने स्वतः केलेला तसेच पक्षाने केलेल्या खर्चाचाही समावेश असेल. या निवडणुकीचे मतदान हे मतपत्रिकेद्वारे होणार असून सरकारी छापखान्यामध्ये निवडणूक चिन्ह वाटप झाल्यावर आठवडाभरात छपाई केली जाणार आहे. या निवडणुकीसाठीचा एकूण खर्च सुमारे ६ कोटी रुपये असेल.

संबंधित बातम्या