महिलांसंबंधित २३० प्रकरणे तपासाविनाच!

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

चार वर्षांत १४७३ गुन्हे नोंद; २० टक्के गुन्ह्यांचा तपास पुराव्याअभावी बंद

गेल्या चार वर्षांत (एप्रिल २०१६ ते जानेवारी २०२०) या काळात १४७३ गुन्हे नोंद झाले आहेत.

पणजी : राज्यात महिलांवरील अत्याचार, हुंडाबळी, बलात्कार, अपहरण, विनयभंग, थट्टामस्करी, आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच वेश्‍या व्यवसाय अशी अनेक प्रकरणे वाढत आहेत. त्यापैकी २० टक्के गुन्ह्यांचा तपास पुराव्याअभावी बंद करण्यात आला आहे, तर २३० प्रकरणे संशयितांचा शोध न लागल्याने पडून आहेत, अशी माहिती पोलिस खात्यातील सूत्राने दिली.

पोलिस ठाणे तसेच महिला पोलिस स्थानकांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे व छळवणुकीचे गुन्हे नोंद होते. मात्र, अनेकवेळा या गुन्ह्यातील संशयिताला अटक केल्यानंतर न्यायालयात आरोपपत्र सादर केल्यावर त्यातील साक्षीदार गायब झालेले असतात. त्यामुळे काही प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष सुटतात. काही प्रकरणे उशिरा नोंद होत असल्याने संशयिताचा शोध घेताना तो सापडत नाही. बहुतेक प्रकरणे ही परप्रांतीय संशयितांविरुद्ध असल्याने ते पसार होतात.

एप्रिल २०१६ ते डिसेंबर २०१६ या काळात ३१३ प्रकरणे नोंद झाली त्यामध्ये ७० प्रकरणांचा तपास लागलेला नाही. त्यात बलात्कार ४१, अपहरण, ५२, विनयभंग १३२, थट्टामस्करी ३०, विवाहितेची छळणूक १५ , आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे २, हुंड्यांची मागणी ४, हुंडाबळी २ व ३५ वेश्‍या प्रकरणांचा समावेश आहे. २०१७ सालमध्ये या प्रकरणांमध्ये वाढ होऊन ही संख्या ४२० झाली. त्यामध्ये ६२ प्रकरणांतील संशयितांचा शोध लागला नाही. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे. या काळामध्ये ७८ बलात्कार, ६५ अपहरण, १६७ विनयभंग, ४४ थट्टामस्करी, १८ विवाहितेची छळणूक, ४ आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, ५ हुंड्यांची मागणी, १ हुंडाबळी व ३९ वेश्‍या प्रकरणांचा त्यामध्ये समावेश आहे.

२०१८ साली ३८५ प्रकरणे नोंद झाली, त्यामध्ये ५४ प्रकरणांचा तपास अजून लागलेला नाही. या प्रकरणातील संशयित सापडलेले नाहीत. या काळात ६२ बलात्कार, ७९ अपहरण, १४८ विनयभंग, ४४ थट्टामस्करी, ७ विवाहितेची छळणूक, २ आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, ५ हुंड्यांची मागणी, १ हुंडाबळी व ५१ वेश्‍या प्रकरणांचा समावेश आहे. २०१९ साली ३४६ प्रकरणे नोंद झाली. त्यामध्ये ४२ प्रकरणांचा तपास अजून लागलेला नाही. या प्रकरणातील संशयित सापडलेले नाहीत. या काळात ७० बलात्कार, ५४ अपहरण, १२८ विनयभंग, ४० थट्टामस्करी, ७ विवाहितेची छळणूक, २ आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे, ४ हुंड्यांची मागणी, १ हुंडाबळी व ४० वेश्‍या प्रकरणांचा समावेश आहे. जानेवारी २०२० पर्यंत ९ प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यामध्ये ४ बलात्कार, १ अपहरण, २ विनयभंग व २ वेश्‍या प्रकरणाचा समावेश आहे.

राज्यात मोठ्या प्रमाणात मसाज पार्लरच्या नावाखाली काही ठिकाणी वेश्‍या व्यवसाय सुरू असून त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिस ठाण्यांना निर्देश देण्यात आले आहेत. या पार्लरचे मालक हे बिगर गोमंतकीय तसेच त्यामध्ये काम करणाऱ्या महिलाही या गोव्यातील नसतात. या पार्लरमधील माहिती मिळण्यासाठी काहीवेळा बोगस गिऱ्हाईकाचा वापर करावा लागतो. त्यासाठी काहीवेळा पोलिस किंवा एखाद्या पोलिस मित्राची मदत घेतली जाते. हुंड्यामध्ये सतावणूक करण्यात येणारी प्रकरणे अधिक तर ही महिला पोलिस ठाण्याकडे वर्ग केली जातात, असे अधिकाऱ्याने सांगितले.

 

चार वर्षांतील महिलांवरील अत्याचाराच्या घटना
गुन्हे वर्ष २०१६ वर्ष २०१७ वर्ष २०१८ वर्ष २०१९

बलात्कार ४१ ७८ ६२ ७०

विनयभंग १३२ १६७ १४८ १२८

अपहरण ५२ ६५ ७९ ५४

थट्टामस्करी ३० ४४ ४४ ४०

वेश्‍या ३५ ३९ ५१ ४०

 

 

संबंधित बातम्या