‘मालीम’वरून २४ टन मासळी निर्यात

Dainik Gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

मालीम जेटीवरून सध्या सरासरी २४ टन मासळी केरळला निर्यात होत आहे. जाळ्यात सापडणाऱ्या मासळीच्या प्रमाणावर परराज्यातील निर्यात अवलंबून आहे. मासळीची आवक जास्त झाली, तर किमान ४० ते ४५ टन मासळी येथून निर्यात होते.

पणजी :

मालीम जेटीवरून सध्या सरासरी २४ टन मासळी केरळला निर्यात होत आहे. जाळ्यात सापडणाऱ्या मासळीच्या प्रमाणावर परराज्यातील निर्यात अवलंबून आहे. मासळीची आवक जास्त झाली, तर किमान ४० ते ४५ टन मासळी येथून निर्यात होते. टाळेबंदीच्या काळात केंद्र सरकारने मासेमारीला परवानगी दिल्याने किमान या व्यवसायाला थोडाफार दिलासा मिळाला आहे.
जेटीवर असलेल्या ३५० बोटींपैकी ६० ते ६५ टक्के बोटीच मच्छिमारीसाठी समुद्रात गेल्या आहेत. त्यामुळे मासळी पकडण्याचे प्रमाण घटणार आहे. त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे यावर्षी अनेक वादळांमुळे मासेमारीसाठी बोटी गेल्या नाहीत, असे सांगून मांडवी फिशरमन मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष हर्षद धोंड यांनी ‘गोमन्तक'ला सांगितले आम्हाला मालवण, रत्नागिरी, गुजरात या बाजूला मासळीसाठी जावे लागते. त्याशिवाय कर्नाटकाकडे कारवार, बंगळुरू, भटकळपर्यंत खोल समुद्रात मासळीसाठी जावे लागते.

एकाचवेळी एकाच प्रकारची मासळी जाळ्यात येत नसते. त्यामुळे वर्गीकरण केल्यानंतर त्यातील गोव्यातील लोक खाणारे मासळी बाजूला केली जाते. सध्या या जेटीवरून चार ट्रक मासळी केरळला निर्यात केली जाते, तेवढीच मासळी कदाचित दक्षिण गोव्यातूनही केरळला जात आहे.
- हर्षद धोंड, मांडवी फिशरमन मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष

कर्मचाऱ्यांअभावी फटका
मालीम जेटीवर ३५० बोटींपैकी ११० पर्सिन आणि २४० फिशिंगच्या बोटी आहेत. त्यापैली ६० ते ६५ टक्के बोटी समुद्रात गेल्या आहेत. कर्मचाऱ्यांअभावी काही मालकांनी बोटी मासेमारीसाठी पाठविल्या नाहीत. ३५० बोटींपैकी ३२० पर्यंत बोटी जर मासेमारीसाठी समुद्रात गेल्यातर मासळी मोठ्या प्रमाणात येण्याची चिन्हे अधिक असतात, असे धोंड म्हणाले.

मासळीचे आयातदार राज्य
बुगडी, हारेबांगडे, बाळ्‍ळे, बॅट, लालदी, सीडीखापी हे मासे गोव्यात कोणी खात नाहीत. त्यामुळे ही मासळी आम्हाला केरळला पाठवावी लागते. विशेष बाब म्हणजे देशभरातून अशा स्वरुपाची मासळी एकमेव केरळ राज्यात जाते. त्यामुळे केरळ राज्यावर देशभरातील मासळी व्यवसायिकांचे व्यवहार अवलंबून असल्याचे सांगून धोंड म्हणाले की, याशिवाय रत्नागिरीला फ्रिजिंगसाठी काही मोजकी मासळी पाठविली जाते. त्यात राणे फिश, माकूळ (माणके) आणि कापशी (झिंगा) यांचा समावेश आहे. हे मासे जेवढ्या प्रमाणात जेटीवर येतात, ते सर्व फ्रिजिंगला पाठविले जातात. परंतु, यांचे प्रमाण कमी असते. कापशी हे झिंगे रत्नागिरीतून परदेशात पाठविले जातात, असेही धोंड यांनी सांगितले.

संबंधित बातम्या