गेल्यावर्षी राज्यात ३०६१ आगीच्या घटना

Dainik Gomantak
मंगळवार, 7 जानेवारी 2020

राज्यात ७३ ठिकाणी प्रमुख आगीच्या घटनांच्या समावेशासह दलाच्या जवानांनी सुमारे ४६ कोटी ४३ लाख ६१ हजार ५९३ रुपयांची मालमत्ता वाचविली मात्र आगीमध्ये ५३ कोटी ७५ लाख ९५ हजार ०१२ रुपयांची मालमत्ता खाक झाली.

विलास महाडिक
पणजी

अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला गेल्या वर्षभरात राज्यात अनेक ठिकाणी लागलेल्या आगीबाबत ३०६१ तर बिगर आगीचे ५७१४ मिळून ८७७५ फोन कॉल्स नियंत्रण कक्षाला आले. दलाच्या जवानांनी आगीच्या घटनास्थळी जाऊन आग विझविताना ४६.४३ कोटींची मालमत्ता वाचविली तर ५३.७५ कोटीची मालमत्ता आगीत खाक झाली. मनुष्यबळ कमी असूनही शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याची यशस्वी कामगिरी बजावली आहे.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी प्रतिदिन किमान ८ आगीच्या घटनांचे तर बिगर आगीसंदर्भातचे प्रतिदिन १६ फोन कॉल्स नियंत्रण कक्षाकडे नोंद झाले आहेत. यावर्षी राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पावसाळ्यामध्ये अधिक फोन कॉल्सची नोंद झाली. त्यामध्ये अधिक तर कॉल्स हे रस्त्यावर व घरावर झाडे पडण्याचे होते. कक्षाला आलेल्या फोन कॉल्समध्ये नऊ कॉल्स हे बोगस होते. आगीमुळे झालेल्या घटनांमध्ये मनुष्यहानी झाली नाही मात्र २ जनावरांचा मृत्यू झाला आहे. इतर अपघातांच्या प्रकरणांमध्ये ९६ मनुष्यांना तर ३५ जनावरांना जीव गमावावा लागला. दलाच्या जवानांनी आगीच्या घटनांमध्ये २ मनुष्यांचा व २ जनावरांचा तर इतर अपघातांमध्ये ३२४ मनुष्यांचा व ५९२ जणांचा जीव वाचविण्यात यश आले.
या दलाची पणजीतील मुख्यालयासह धारबांदोडा वगळता प्रत्येक तालुक्यात किमान एक अग्निशमन स्थानक आहे. या दलाकडे सुमारे ७५० मनुष्यबळ आहे तर प्रत्येक स्थानकावर किमान दोन पाण्याच्या बंबच्या गाड्या आहेत. पर्वरी, कुंकळ्ळी येथे नव्या अग्निशमन दलासाठी प्रस्ताव आहे. त्याचे काम अजूनही निधीअभावी सुरू झालेले नाही. या दलाकडे असलेल्या मनुष्यबळाची कमतरता आहे. अग्निशमन दल हे २४ तास काम करत असल्याने तीन पाळ्यांमध्ये ड्युटी नेमणे शक्य होत नाही. पावसाळ्यात तर अनेकांना साप्ताहिक सुट्टी न घेता काम करावे लागते अशी माहिती दलाच्या अधिकाऱ्याने दिली.
राज्यात ७३ ठिकाणी प्रमुख आगीच्या घटनांच्या समावेशासह दलाच्या जवानांनी सुमारे ४६ कोटी ४३ लाख ६१ हजार ५९३ रुपयांची
मालमत्ता वाचविली मात्र आगीमध्ये ५३ कोटी ७५ लाख ९५ हजार ०१२ रुपयांची मालमत्ता खाक झाली. आगीच्या व इतर अपघात घटना मिळून ५३.३९ कोटींची मालमत्ता वाचविली तर ५७.७८ लाखांची नुकसानी झाली. मालमत्ता वाचविण्यापेक्षा त्याचे नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. अनेकवेळा आगीची माहिती उशिरा मिळाल्याने काही ठिकाणी आगीत मोठ्या प्रमाणात मालमत्ता खाक होण्याचे प्रकार घडले आहेत. बहुतेक आगीच्या घटना या रात्रीच्यावेळी लागल्याने मदतकार्यात अडचणी आल्या होत्या तरी जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अधिकाधिक मालमत्ता वाचविण्याचे प्रयत्न केले.
२०१९ मध्ये सांज जुझे दी आरियल - नेसाय येथील मे. टेक फोर्स कम्पोझिट्स या कंपनीला सकाळच्या सुमारास मोठी आग लागली होती. मडगावच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून ही आग विझविण्यात यश मिळवले मात्र २.५ कोटींची मालमत्ता खाक झाली होती तर ३ कोटींची मालमत्ता वाचविली होती. वेर्णा येथील मे. समर्थ वूड वर्क्स एजन्सीला आग लागून २ कोटींचे नुकसान झाले होते. या दोन्ही घटनांमध्ये कोटीहून अधिक नुकसान झाले होते व गेल्या वर्षातील सर्वात मोठ्या आगीच्या घटना होत्या.
राज्यातील ७३ आगीच्या घटनांमध्ये रेडिमेड कपड्यांची दुकाने, रेस्टॉरट अँड बीच क्लब, फ्लॅट, ऊस बागायती, घरे, पोलिहाऊस, मे. बोट क्राफ्ट फॅक्टरी, वाहने, हार्डवेअर दुकान, बोटी, स्वीट होम सिम्फनी इमारतीतील दुकाने, पीर्ण येथील बँक, गोडाऊन याचा त्यात समावेश आहे. या घटनांमध्ये पाच लाखापासून ते दोन कोटीपर्यंतच्या मालमत्तेच्या नुकसानीचा समावेश आहे. गेल्यावर्षी मे व डिसेंबर या महिन्यात सोनसोडो येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागण्याच्या घटना घडल्या. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने एरिएल शिडीचा वापर करून या आगीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले. बहुतेक आगीच्या घटनांमध्ये शॉर्टसर्किट हे कारण नमूद केले
गेले आहे.

वर्षभरात ४३८३ जणांना प्रशिक्षण
राज्यातील आगीच्या घटनांवेळी आग विझविण्याबरोबरच पणजीतील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात गेल्या वर्षभरात ४३८३ जणांना प्रशिक्षण देण्यात आले. या दलाच्या आवारात प्रशिक्षण केंद्र असल्याने इतर राज्यातील तारांकित हॉटेलातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणातून खात्याला महसूल मिळतो त्याचा वापर नव्या अत्याधुनिक उपकरणांच्या खरेदीसाठी वापरला जातो. या दलातर्फे विविध प्रकारच्या २८९५ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. दलाच्या आवारात सुसज्ज अशी नवी इमारतीचे काम सुरू आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे संचालक अशोक मेनन यांनी दिली.

संबंधित बातम्या