५००० लोकांची होणार कोरोना पडताळणी चाचणी

Dainik Gomantak
बुधवार, 22 एप्रिल 2020

५००० लोकांची होणार कोरोना पडताळणी चाचणी 

पणजी,
राज्‍यातील लोकांच्‍या आरोग्‍याचा दारोदारी जाउन १३ ते १५ एप्रिलदरम्‍यान सर्‍व्‍हे करण्‍यात आला होता. या सर्‍व्‍हेतील सुमारे ५ हजारपेक्षा अधिक लोकांच्‍यात इनफ्‍लुएन्‍झा लाइक इलनेस म्‍हणजेच आजारपणाची लक्षणे असल्‍याने त्‍यांची कोरोना पडताळणी चाचणी करण्‍यात येणार आहे. हि चाचणी केवळ सर्तकता म्‍हणून टप्‍प्‍याटप्‍याने केली जाणार असल्‍याने लोकांनी घाबरण्‍याची गरज नाही, असे आवाहन सरकारकडून करण्‍यात आले आहे. 
डॉ. जगदीश काकोडकर यांच्‍या अध्‍यक्षेखाली गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील टीमने सरकारने केलेल्‍या सर्‍व्‍हेचा अहवाल तयार केला. आणि या अहवालातून त्‍यांनी या ५००० जणांची चाचणी सर्तकता म्‍हणून करण्‍यासाठी सांगितले आहे. हा सर्‍व्‍हे राज्‍यातील ४.५ लाख घरातील लोकांचा करण्‍यात आला होता.
आरोग्‍य खात्‍यातील सुत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, या चाचण्‍या टप्‍प्‍याटप्‍प्‍याने केल्‍या जाणार आहेत. या चाचण्‍या उद्यापासून म्‍हणजेच बुधवारपासून सुरू करण्‍याचा सरकारचा प्रयत्‍न असणार आहे. अझिलो म्‍हापसासारख्‍या रूग्‍णालयात आता चाचण्‍या करण्‍याची सोय उपलब्‍ध करून दिली असल्‍याने आणि सरकारकडे या लोकांच्‍या घरांच्‍या पत्त्‍यासह संपर्क क्रमांकासारखी सर्व माहिती असल्‍याने लोकांपर्यंत चाचण्‍यांसाठी पोहचणे सोपे जाणार आहे. 
राज्‍याला कोरोनामुक्‍तीचा दर्जा मिळाला असला तरी राज्‍य सरकार अद्यापही या बाबततीत सर्तक आहे. राज्‍यात १००० थर्मल गन पोहचल्‍या असून त्‍यांचा वापर करीत लोकांची तपासणी सुरू आहे. 

संबंधित बातम्या