कुमेरी शेतकऱ्यांचे ५५ दावे निकालात

Dainik Gomantak
बुधवार, 22 जानेवारी 2020

एकूण १२०० खटल्या पैकी नुने येथील २५ व काले येथील ३० जणांना मान्यता देण्यात आली.

मनोदय फडते
कुडचडे

कुमेरी प्रश्न त्वरित निकालात काढण्यासाठी दर आठवड्याला सुनावणी घेतली जात असून एकूण १२०० खटल्या पैकी नुने येथील २५ व काले येथील ३० जणांना मान्यता देण्यात आली. येत्या आठवड्यात अजून शंभरच्यावर प्रकरणे निकालात काढण्यात येणार असल्याचे, सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी सांगितले.
सावर्डे येथे कुमेरी शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, मामलेदार मनोज कोरगावकर, सरपंच संदीप पाऊसकर, वनअधिकारी मिंगेल फर्नांडिस आदी उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सरकारने कुमेरी दावे निकालात काढण्यासाठी न्यायालयात सुनावणी घेतली परंतु त्यांची माहिती शेतकऱ्यांना मिळू शकली नाही. अशा शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेतले जाणार नाही. शिवाय ज्यांचे पुरावे अर्धवट आहे त्यातील त्रुटी तपासून पुन्हा चर्चा करण्यात येईल. मात्र कोणाचाही हक्क हिरावून घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री दीपक पाऊसकर म्हणाले की, कोणावरही अन्याय होणार नाही याची खात्री देत प्रत्येकाने संयम बाळगण्याचे आवाहन करीत सरकारी यंत्रणेला शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
काजू शेतकऱ्यांच्यावतीने बोलताना दत्ता सावंत म्हणाले की, काही शेतकऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे नाही तर काहींना सरकार दरबारातून मिळाली नाही. अशा सर्वानी सुमारे पन्नास वर्षांपूर्वी काजू लागवड केली याची नोंद घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी उपजिल्हाधिकाऱ्यानी घेण्याचे आवाहन यावेळी केले.

संबंधित बातम्या