शेती नुकसानभरपाईसाठी ५ कोटींची तरतूद  

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

शेती, फळे, भाजी लागवडीच्या नुकसान भरपाईसाठी ५ कोटींची तरतूद

कृषीमंत्री बाबू कवळेकर यांची माहिती

पणजी : राज्यात मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे शेतीचे व फळे-भाज्यांच्या उत्पादनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाई लवकरात लवकर द्यावी अशी मागणी आमदार सुदिन ढवळीकर व आमदार विल्फ्रेड डिसोझा यांनी शून्यतासावेळी विधानसभेत केली. सुमारे ५ कोटींची नुकसानभरपाईची तरतूद करण्यात आली असून लवकरच ही रक्कम दिली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी दिली.

शेतीचे नुकसान झाले तेव्हा सरकारने एका महिन्यात नुकसानभरपाईची रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले होते. शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी सरकार १६.८ कोटी रुपये देणे आहे. वित्त खात्यात त्याची फाईल गेली व निधीच नसल्याने ती तेथेच पडून आहे. कृषी खात्याचे अधिकारी ही नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी म्हणून गंभीर नाहीत व ते आळशी बनले आहेत. ही नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी काय करावे? शेतीच्या पिकाला आधारभूत किंमत देऊनही शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. काजू बी प्रति किलो दिडशे रुपये किलो तर काजूगर प्रति किलो हजार रुपये विकले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे पावसामुळे झालेल्या शेतीचे व फळे-भाज्यांचे कीड लागून झालेली नुकसानभरपाई केव्हा देणार असा प्रश्‍न आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला.

वेर्णा गावात फळे व शेतीच्या पिकांना कीड लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुवे मतदारसंघातील ५० टक्के शेतकरी हे शेतीवर अवलंबून असतात. मिरची, कलिंगड व हळसाणे उत्पन्नाचे पीक घेतात. त्यांचे हे पीक किडीमुळे नष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने त्यांना योग्य दर निश्‍चित करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी आमदार विल्फ्रेड डिसोझा यांनी केली.

उत्तरेसाठी ४०, तर दक्षिणेसाठी
३० लाखांची नुकसान भरपाई

वेर्णा, धुळापी, माजोर्डा, उतोर्डा तसेच मडकई भागात शेतीचे तसेच फळे-भाज्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. आतापर्यंत ७० लाख रुपये नुकसानभरपाईपोटी दिले गेले आहेत त्यामध्ये उत्तरेसाठी ४० लाख तर दक्षिणेसाठी ३० लाखांचा समावेश आहे. पेडणे व डिचोली येथे केळी बागायतींचे नुकसान झाले त्याच्या नुकसानभरपाईपोटी मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून ९० लाख दिले गेले आहेत. एकूण नुकसान भरपाई १६.८ कोटी रुपये नाही तर ६.५० कोटी आहे. सरकारने नुकसानभरपाईपोटी ५ कोटींची तरतूद केली असून ती लवकरच दिली जाईल असे उपमुख्यमंत्री तथा कृषीमंत्री बाबू कवळेकर यांनी आश्‍वासन दिले.

 

संबंधित बातम्या