९० टक्के कर्जबाजारी ‘खाण’ संबंधित

Dainik Gomantak
बुधवार, 15 जानेवारी 2020

आता या कर्जाचे व्याजच अव्वाच्या सव्वा होऊ घातले असून ही कर्जफेड करायची कशी ही चिंता खाण अवलंबितांना सतावत आहे. दारात ठेवलेले ट्रक तसेच इतर वाहने गंजत चालली असून या वाहनांच्या आधारे कर्जाची रक्कम घेतली, पण आता पुढे काय, असा सवालही या खाण अवलंबितांनी केला आहे.

पाळी

राज्यातील खनिज खाणी बंद असून त्या पुन्हा कधी सुरू होतील याबाबत अनिश्‍चितता असल्याने खाण भागातील लोक धास्तावले आहेत. खाणी सुरू असताना खाण अवलंबितांनी बॅंकांतून कर्ज काढले. परंतु आता या कर्जाचे व्याजच अव्वाच्या सव्वा होऊ घातले असून ही कर्जफेड करायची कशी ही चिंता खाण अवलंबितांना सतावत आहे. दारात ठेवलेले ट्रक तसेच इतर वाहने गंजत चालली असून या वाहनांच्या आधारे कर्जाची रक्कम घेतली, पण आता पुढे काय, असा सवालही या खाण अवलंबितांनी केला आहे.
सध्या खाण भागातील लोकांनी या भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर भरोसा ठेवला असून नजीकच्या काळात खाणी सुरू झाल्या नाहीत तर पुढे काय, असा सवाल केला आहे. खनिज विकास महामंडळ स्थापन करून या खाणी सुरू करण्यासाठी खाण अवलंबितांनी संमती दर्शवली असून गेली साठ वर्षे ज्या लोकांनी खाणी चालवल्या त्या खाण मालकांनी खाण भागासाठी काय केले, असा सवाल केला आहे.
वाहने सुरू होती, काही प्रमाणात रोजगार होता, त्यामुळे खाण भागातील लोकांनी घरदुरुस्ती, घर बांधणी तसेच दुचाकी किंवा चारचाकी वाहन खरेदीसाठी कर्ज घेतले होते. कर्ज घेताना या लोकांना संबंधित बॅंका आणि पतसंस्थांनीही सढळ हात ठेवला. त्यामुळे विनासायास हे कर्ज उपलब्ध झाले. खाण भागातील थकलेल्या कर्जदारांचा आकडा पाहिला तर त्यात ९० टक्के कर्जदार हे खाणीशी संबंधित व्यवसाय, नोकरी आदीशी संबंधित आहेत. इतर दहा टक्के हे खाण व्यवसाय सोडून इतर उद्योगधंदे किंवा सरकारी व खाजगी आस्थापनातील नोकरदार आहेत.
खाणी सुरू होत्या, तोपर्यंत वाहने तारण ठेवून कर्ज घेतले गेले. आता वाहनेच बंद आहेत. त्यातच गेल्या महिन्यात लीलावाच्या खनिज मालाची वाहतूक करण्यासाठी काही ट्रकमालकांनी आपले ट्रक तयार केले. हा लीलावाचा खनिज माल संपल्यानंतर पुढे काय ही चिंताही आता ट्रकमालकांना सतावू लागली आहे.
खाण भागातील विशेषतः पतसंस्थांकडून लोकांनी कर्ज घेतले आहे. राष्ट्रीय बॅंकांकडून कर्ज घेण्यास मर्यादा असल्याने या बॅंकांतील कर्जाची रक्कम मर्यादित आहे. मात्र पतसंस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्जाची उचल झाल्याने या पतसंस्थांचे संचालकही धास्तावले आहेत. कर्जाची रक्कम फेडायची तर कर्जदारांकडून घ्यायचे काय, अशी विचारणा या लोकांकडून केली जात आहे.
व्याज वाढतेय
कर्जाची रक्कम उचलली खरी, पण आता ती फेडण्यासाठी उत्पन्नच नसल्याने खाण अवलंबितांची गोची झाली आहे. खाण कंपन्यांनी जो काही तुटपुंजा रोजगार उपलब्ध केला होता, तोही आता बंद असल्याने रोजंदारीवर जाण्याखेरीज लोकांना पर्याय उरलेला नाही. त्यातच रोजंदारीच्या पगारात खायचे काय, मुलांच्या शिक्षणासाठी वापरायचे काय आणि आजार तसेच इतर कामासाठी पैसा कुठून खर्च करायचा असा सवाल खाण अवलंबितांकडून केला जात आहे.

प्रतीक्षा खाण महामंडळाची
खाण भागातील लोकांना खनिज विकास महामंडळ स्थापन करण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. राज्यातील खनिज खाणी सुरू करण्यासाठी हे महामंडळ स्थापन करून त्यातूनच या खाणी सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. खाण मालकांकडून खाण भागासाठी भरीव असे कोणतेच कार्य झाले नसल्याने खाण अवलंबितांचा रोष या खाण मालकांवर आहे. त्यामुळे खाण महामंडळालाच जास्त प्राधान्य दिले जात आहे.
-

राज्यातील खाणी दुसऱ्यांदा बंद होऊन आता मार्चमध्ये दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न उपस्थित होत असल्याने या खाणी त्वरित सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत. विशेष म्हणजे खाण भागातील लोक कर्जबाजारी झाल्याने त्यादृष्टीने सरकारी निर्णय अपेक्षित आहे.
विद्याधर नाईक, तिस्क - उसगाव

खाणी सुरू करण्यासाठी सरकार पातळीवर निर्णय घेण्यात चालढकल चालवली जात आहे. खाणी सुरू करण्यासाठी महामंडळ स्थापन करणे हा पर्याय चांगला आहे, त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत. नवीन वस्तू खरेदीसाठी, घर बांधणीसाठी लोकांनी कर्ज घेतले, परंतु आता या कर्जाची रक्कम फेडणे शक्‍य होत नाही. त्यामुळे खायचे वांदे झाले आहेत.
रामचंद्र गावकर, धारबांदोडा

संबंधित बातम्या