कासवांची ९५ टक्के पिले समुद्रात परतली

Dainik Gomantak
बुधवार, 15 एप्रिल 2020

गालजीबाग, आगोंद व मोरजीच्या किनाऱ्यांवर शॅक्स घालण्यास किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने मर्यादा घातली तरी बहुतांशपणे शॅक्सचे चालक सहकार्य करतात. काही कासवांनी तर मोरजीला विठ्ठलदासवाड्याच्या दिशेने असलेल्या शॅक्सच्या जवळ, काहींनी शॅक्सच्या रेताड जमिनीत अंडी घातली.

अवित बगळे
पणजी, 

गोव्यात कोविड १९ ची टाळेबंदी लागू असताना किनाऱ्यावरुंन मात्र चांगली खबर ऐकायला मिळाली आहे. ऑलीव्ह रिडले जातीच्या कासवांनी घातलेल्या अंड्यातून ९५ टक्के पिले या काळात समुद्रात गेली आहेत. एरव्ही एकूण अंड्यापैकी ७३ टक्के पिलेच सुखरुपपणे समुद्रात जाऊ शकत होती.
पर्यावरण अभ्यास केंद्राचे संशोधक सुजीतकुमार डोंगरे यांनी गोमन्तकला दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात पूर्वी दोन जातीचे कासव अंडी घालण्यासाठी येत असत. आता केवळ ऑलीव्ह रिडले जातीचे कासवच अंडी घालण्यासाठी येतात. गालजीबाग, आगोंद आणि मोरजीच्या किनाऱ्यावर हे कासव अंडी घालतात असा समज असला तरी यंदा कांदोळीच्या किनाऱ्यावर कासवांनी अंडी घातली होती. एका भारतीय पर्यटकाच्या ती बाब लक्षात आल्यानंतर ती अंडी हळुवारपणे रेतीतून काढून मोरजीला हलवण्यात आली. त्या अंड्यांतून सर्व पिले सुखरुपपणे समुद्रात गेली आहेत. आश्वे मांद्रे येथेही यंदा कासवांनी अंडी घातली होती.
गालजीबाग, आगोंद व मोरजीच्या किनाऱ्यांवर शॅक्स घालण्यास किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने मर्यादा घातली तरी बहुतांशपणे शॅक्सचे चालक सहकार्य करतात. काही कासवांनी तर मोरजीला विठ्ठलदासवाड्याच्या दिशेने असलेल्या शॅक्सच्या जवळ, काहींनी शॅक्सच्या रेताड जमिनीत अंडी घातली. त्याबाबत शॅक्स चालकांनी माहिती दिल्यानंतर ती अंडी इतरत्र सुरक्षित स्थळी हलवण्यात आली अशी माहिती देऊन ते म्हणाले,कासव अंडी घालण्यासाठी येतात याचा फायदा पर्यटनवृद्धीसाठी घेतला गेला पाहिजे. शेजारील महाराष्ट्रात कासवांची पिले समुद्रात जाण्याच्यावेळी मोठा गाजावाजा करून कासव महोत्सव आयोजित केला जातो. त्या धर्तीवर येथे संकल्पना राबवल्या गेल्या पाहिजे. मुळात गोमंतकीय माणूस कासवांच्या विरोधात नाही. कासवे अंडी घालण्यासाठी येतात ही सरकारी यंत्रणेला माहिती देणाऱ्या व्यक्ती या स्थानिकच होत्या.
यंदा उत्तर गोव्यात १६ तर दक्षिण गोव्यात १७ ठिकाणी कासवांनी अंडी घातल्याची माहिती देऊन ते म्हणाले, उत्तर गोव्यातून कासवांची ५८३ पिल्ले समु्द्रात गेली. या पद्धतीने दक्षिण गोव्यातूनही पिल्ले समुद्रात गेली आहेत. कासवांना संरक्षण द्या या जनजागृती मोहिमेस आलेले यश म्हणून ९५ टक्के पिले जीवंतपणी समुद्रात पोचली याकडे पाहता येईल असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या