सरकारच्या धोरणांवर 'आप' ची टीका

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

जनहितविरोधी निर्णयांमुळे सरकार ‘बॅकफूट’वर
प्रशासनावरील नियंत्रणामागे भाजपचा सूत्रधार, ‘आप’तर्फे एल्विस गोम्सचा आरोप

सरकारवर पडद्यामागून नियंत्रण ठेवले जात असून त्यामागे सूत्रधार असल्याचा असा आरोप ‘आप’चे निमंत्रक एल्विस गोम्स यांनी व्यक्त केला. दिल्लीत केंद्रातील भाजप सरकारची यंत्रणा समोर असताना आम आदमी पक्षाने बहुमत मिळवून व सरकार स्थापन करून दाखवून दिले आहे की देशातील लोक बदलू लागले आहेत.

पणजी : भाजप सरकारने गेल्या काही महिन्यांत घेतलेल्या जनहितविरोधी निर्णयामुळे बॅकफूटवर जाण्याची नामुष्की त्यांना आली आहे. त्यामुळे सरकारच्या कार्यक्षमतेबाबत संशय उपस्थित झाला आहे. पंचायत, जमावबंदी, शहरी दर्जा यासारखे निर्णय सरकारला लोकांच्या विरोधामुळे व विरोधकांकडून झालेल्या टीकेमुळे मागे घ्यावे लागले आहेत.

अबकारी शुल्क दरवाढीबाबतही फेरविचार करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. सरकारने केलेल्या विकासकामांना मतदार पाठिंबा देत आहे हे दिल्ली निवडणुकीतून दिसून आले आहे. गोव्यातही ही परिस्थिती आगामी निवडणुकांमध्ये हळूहळू दिसणार आहे. सरकार जे काही निर्णय राज्यासाठी घेत आहे ते वादग्रस्त ठरून ते मागे घेण्याची पाळी येत आहे. पंचायतींच्या हक्कांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या दोन परिपत्रकांना ग्रामपंचायतींकडून विरोध झाल्याने ती मागे घेतली. जमावबंदी कलम १४४ तसेच ५६ गावांना शहरी दर्जा देण्याची अधिसूचनाही लोकांनी उपस्थित केलेल्या संतप्त प्रतिक्रियामुळे मागे घेतला. त्यामुळे सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता व स्थिरता आहे की नाही याबाबतच शंका येते अशी टीका गोम्स यांनी केली.

दिल्लीत भाजप व काँग्रेस असे दोन राष्ट्रीय राजकीय पक्ष आम आदमी पक्षासमोर निवडणूक रिंगणात होते तरीही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात नागरिकांना उपलब्ध केलेल्या पाणी, वीज, शिक्षण तसेच विकासकामांमुळे मोठ्या बहुमताने निवडून आले. भाजपने जातिवादाला निवडणुकीत जोर दिला होता मात्र तो झिडकारून मतदार विकासाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले आहे. केजरीवाल यांनी निवडणूक प्रचारावेळी ‘आप’ने काम केले असेल तर पुन्हा निवडून द्या व काम केले नसेल असे वाटत असेल तर मते देऊ नका असे आवाहन मतदारांना केले होते. मतदारांनी भाजपच्या जातिवादाला बळी न पडता केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा विश्‍वास ठेवला. त्यामुळे गोव्यातील भाजप सरकारनेही पैशांची लूट थांबवून दिल्लीतील निवडणूक ‘आप’ने ज्या मुद्यांवर लढविली.

निवडणूक आयुक्त नावापुरतेच

त्यातून धडा घ्यावा व त्या दिशेने गोव्याच्या विकासाची वाटचाल लोकहित निर्णय घेऊन करण्याची मागणी गोम्स यांनी केली. यावेळी पक्षाचे वाल्मिकी नाईक व प्रदीप पाडगावकर उपस्थित होते.
राज्यात कार्निव्हल महोत्सवावर अनावश्‍यक अफाट खर्च करदात्यांच्या पैशांमधून केला जात आहे. गेली तीन वर्षे राजधानी पणजीमध्ये वाहतुकीची कोंडी होत असल्याने कार्निव्हल मिरवणूक मिरामार ते दोनापावल बगल रस्त्यांवरून काढली जात होती मात्र यावर्षी पुन्हा जुनाच मार्ग अवलंबिण्याचा निर्णय झाला आहे. या सरकारला लोकांच्या मूळ गरजांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यांना राज्याचे काहीच पडलेले नाही तर स्वार्थासाठी हे सरकार काम करत आहे. राज्यात बदल घडवून आणण्याची वेळ आली आहे त्यामुळे अधिकाधिक युवकांनी ‘आप’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन गोम्स यांनी केले.

कसिनो व मटक्याबरोबर ड्रग्ज व
वेश्‍या व्यवसायही कायदेशीर करा

सरकारला महसुलाची कमतरता भासत आहे त्यामुळे कोणत्या तरी मार्गाने तो मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंत्री मायकल लोबो यांनी कसिनोंची संख्या वाढविण्याची तसेच मटका कायदेशीर करण्याची मागणी केली आहे यावरून हे स्पष्ट केले. सरकारने कसिनो व मटका याशिवाय ड्र्ग्ज, वेश्‍या व्यवसाय हे सुद्धा कायदेशीर करा त्यामुळे सरकारला मोठा महसूल मिळेल. या सर्वांच्या खात्याचा लोबो यांना मंत्री करावे अशी टीका वाल्मिकी नाईक यांनी केली.

संबंधित बातम्या