डिचोलीतील रस्ते वाहतुकीस असुरक्षीत

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

डिचोली:व्हाळशी-बोर्डे, दोडामार्ग रस्ता बनलाय अपघातप्रणव क्षेत्र

डिचोली:व्हाळशी-बोर्डे, दोडामार्ग रस्ता बनलाय अपघातप्रणव क्षेत्र

एकाबाजूने दंडात्मक कारवाई तर दुसऱ्याबाजूने रस्ता सुरक्षा सप्ताह आदी माध्यमातून जागृती होत असली, तरी रस्त्यांवरील अपघात काही कमी होत नाहीत. अन्य भागांप्रमाणेच डिचोलीतही अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. बेशिस्त आणि धूम स्टाईलने वाहतूक, अरुंद आणि धोकादायक वळणे, गतिरोधकांचा अभाव, वाहतुकीवर नियंत्रण आणि आवश्‍यक सुचना फलकांचा अभाव आदी अनेक कारणांमुळे डिचोली तालुक्‍यातील काही रस्ते वाहतुकीस असुरक्षीत बनले असून, काही ठराविक रस्त्यांवर तर अपघात घडत असतात. शहरातील व्हाळशी-बोर्डे, डिचोली- दोडामार्ग बगलमार्ग तर वाहतुकीस असुरक्षीत बनले आहेत. या दोन्ही रस्त्यावर आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत या दोन्ही मार्गावर मिळून १३ हून अधिक जणांचे बळी गेले आहेत.याशिवाय मायणा-नावेली, नानोडा-दोडामार्ग हे रस्तेही वाहतुकीस असुरक्षीत आहेत.

व्हाळशी रस्ता ‘मृत्यूचा सापळा’..!
डिचोली-म्हापसा मार्गावरील व्हाळशी-बोर्डे रस्ता तर 'मृत्यूचा सापळा' बनला आहे.या मुख्य रस्त्यावर गेल्या साडे चार वर्षात चार दुचाकीस्वार आणि तीन पादचारी मिळून आतापर्यंत सातजणांना प्राण गमवावे बनले आहे.त्याच्यापुर्वीही या रस्त्यावर काहींचे बळी गेले आहेत. यावरुन हा रस्ता वाहतुकीस असुरक्षित असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या ११ जानेवारी रोजी साष्टीवाडा-बोर्डे येथे दुचाकीची मोटारगाडीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात उत्तर प्रदेशमधील सोहरब खान या युवकाचा बळी गेला.साडेतीन वर्षापूर्वी हावजिंग बोर्ड वसाहतीजवळ दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात प्रसाद चणेकर या डिचोलीतील फूटबॉलपटूला आपले प्राण गमवावे लागले.तर त्याच्यानंतर नोव्हेंबर २०१६ मध्ये बोर्डे परिसरात झालेल्या अपघातात गौरीश डांगी हा स्थानिक युवक मृत्यूमुखी पडला. २६ एप्रिल २०१७ रोजी साष्टीवाडा-बोर्डे येथे जीपगाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बार्देश भागातील दुचाकीस्वार प्रेमानंद श्रीपाद सावंत या भारतीय जीवन विमा महामंडळाच्या कर्मचाऱ्यावर क्रूर काळाने झडप घातली. दीड वर्षापूर्वी बोर्डे-व्हाळशी परिसरात अज्ञात वाहनाने ठोकरल्याने व्हाळशी येथील माधव मणेरकर तर डिचोलीतील बाळकृष्ण पाटणेकर या दोघा पादचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. गेल्यावर्षी ८ मे रोजी दुचाकीने ठोकरल्याने प्रेमानंद पांडुरंग सावंत हे मृत्यूमुखी पडले. याशिवाय या रस्त्यावर विविध अपघातात काहीजण जखमी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. साडेचार वर्षांतील या घटना पाहता, व्हाळशी-बोर्डे रस्ता दिवसेंदिवस धोकादायक बनत असून,हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचे स्पष्ट होत आहे.

पेडणे तालुक्‍यात गॅम्‍बलिंग झोन नको​
दोडामार्ग महामार्ग असुरक्षीत..!
व्हाळशी रस्त्याप्रमाणेच महाराष्ट्राशी जोडणारा डिचोली-दोडामार्ग हा महामार्गही वाहतुकीस असुरक्षीत आणि धोकादायक ठरत आहे. हा महामार्ग काहीठिकाणी अरुंद आणि धोकादायक वळणांनी वेढलेला आहे.या महामार्गावरील म्हावळिंगे येथील नेस्ले कंपनीजवळील वळणावर तर वाहने बेशिस्तपणे उभी करून ठेवण्यात येतात. त्यात अवजड वाहनांचाही समावेश असतो. त्यामुळे त्याठिकाणी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असतो.या महामार्गावर अधूनमधून लहान-सहान अपघातांचे सत्र चालूच असते.गेल्या चार वर्षात या महामार्गावरील विविध अपघातात सहाजणांचे बळी गेले आहेत.यावरुन हा महामार्ग वाहतुकीस असुरक्षीत असल्याचे स्पष्ट होत आहे.

संबंधित बातम्या