अॅड पांडुरंग नागवेकर यांचे निधन

Dainik Gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

गेले काही महिने ते आजारी होते, त्यांच्या घशावर शस्त्रक्रीया केली होती.

फोंडा

गोमंतक मराठी अकादमीचे माजी अध्यक्ष अॅड पांडुरंग नागवेकर यांचे आज सकाळी सव्वा सात वाजता  वळवई येथे राहत्या घरी निधन झाले. गेले काही महिने ते आजारी होते, त्यांच्या घशावर शस्त्रक्रीया केली होती. त्या उपचारातून ते सावरले होते. वळवई येथे ललितप्रभा नाट्यमंडळाच्या कार्यक्रमात ते गेल्या महिन्यात सहभागी झाले होते. तो त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम होता.

नागवेकर हे स्व. शशिकांत नार्वेकर यांच्या कार्यकाळात गोमंतक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष होते. नंतर ते अध्यक्ष झाले. वळवई येथे गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या संमेलनाच्या आयोजनात ते हिरीरीने वावरले होते. त्या संमेलनाच्या आयोजन समितीचे चिटणीसपद त्यांनी सांभाळले होते. ते गोमंतक साहित्य सेवक मंडळाचेही सदस्य होते. वळवई येथील ललितप्रभा नाट्यमंडळाचा अमृत महोत्सवी कार्यक्रम गजांतलक्ष्मीच्या प्रांगणात तीन दिवस घडवून आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्या कार्यक्रमात ज्येष्ठ नाट्यकर्मी विद्याधर गोखले यांच्या हस्ते त्यांनी ७५ नाट्यकर्मींचा सत्कार घडवून आणला होता. त्यांनी गोव्याच्या इतिहासावर सातत्याने लेखन केले पुढे ते पुस्तक रुपाने प्रसिद्धही झाले आहे.

अॅड नागवेकर यांच्या मागे पत्नी शील्पमाला, दोन विवाहित कन्या व एक पुत्र असा परिवार आहे.

संबंधित बातम्या